खर्ची घातलेला निधी वाया : उद्यानातील व्यायामाच्या साहित्याची दुरुस्ती करण्याची मागणी
बेळगाव : शहरातील उद्यानाची दुरवस्था झाली असून उद्यानाच्या विकासाकरिता खर्ची घालण्यात आलेला निधी वाया गेला आहे. वडगाव, पटवर्धन लेआऊटमधील उद्यानातील व्यायामाच्या साहित्याची मोडतोड झाली आहे. परिणामी परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे उद्यानातील व्यायामाच्या साहित्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. शहर आणि उपनगरातील उद्यानाचा विकास महापालिकेच्यावतीने करण्यात आला होता. विविध उद्यानात व्यायामाचे साहित्य बसवून फिरावयास येणाऱ्या नागरिकांसाठी सुविधा करण्यात आली आहे. तसेच सुशोभिकरण करण्यात आले आहे. महापालिकेकडून उद्यानासाठी खर्च केला जातो. मात्र देखभालीकडे कानाडोळा केला जात आहे. परिणामी उद्यानांची दुरवस्था झाली आहे. काही उद्यानांमध्ये झाडझुडपे आणि गवत वाढले असून लहान मुलांना खेळण्यासाठी जाणे धोकादायक बनले आहे. तसेच वडगाव पटवर्धन लेआऊटमधील उद्यानामध्ये व्यायामाचे साहित्य बसविण्यात आले होते. पण सदर व्यायामाचे साहित्य खराब झाले आहे. काही साहित्याची मोडतोड झाली असून मोडतोड झालेल्या साहित्याचा वापर करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. पहाटेच्या वेळी व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी मोठ्याप्रमाणात असते. पण सध्या येथील साहित्य खराब झाले असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे येथील खेळाचे साहित्य दुरूस्त करण्याची तक्रार महापालिकेकडे करण्यात आली होती. पण याची दखल घेण्यात आली नाही त्यामुळे महापालिकेच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पटवर्धन लेआऊटमधील व्यायामाचे साहित्य दुरूस्त करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.