Tarun Bharat

पीओपी मूर्ती बंदीचा नुसताच फार्स…!

न्यायालय आदेशाच्या अंमलबजावणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
यंदाच्या गणेशोत्सवासाठीही प्लास्टरच्याच मूर्तींची निर्मिती

संग्राम काटकर कोल्हापूर

विसर्जन स्थळांवरील पाणी प्रदूषणासह पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी 2020 मध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तीवर बंदी घातली. या बंदीला वर्ष होतेय तोवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पीओपीच्या गणेशमूर्ती विक्रीलाच बंदी घातली. या बंदीविरोधात मूर्तीकार संघटना व पीओपी विक्रेत्यांनी दाखल केलेली याचिकाही फेटाळत बंदीवर न्यायालय ठाम राहिले. त्यामुळे 2022 च्या गणेशोत्सवात पीओपीपासून गणेशमूर्ती बनवायची नाही, असे अधोरेखित झाले. मात्र 10 महिने उलटले तरीही जिल्हा प्रशासनाने पीओपी बंदीची अमंलबजावणीच केलेली नाही. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवासाठीही कोल्हापुरातील मूर्तीकारांनी पीओपीच्या हजारो लहान-मोठय़ा गणेशमूर्ती तयार केल्याने बंदीचा केवळ फार्सच ठरला आहे.
कोरोनाचे संकट आणि त्यातच चार फुटांपर्यंत गणेशमूर्तीची गणेशोत्सवात प्रतिष्ठापना करण्याबाबत घातलेल्या निर्बंधामुळे राज्यातील मूर्तिकारांचे अर्थकारण गेली 2 वर्षे बिघडले आहे. गतवर्षी पीओपीच्या गणेशमूर्ती विक्रीवरही बंदी घालत आता अशा मूर्ती बनवायच्याच नाहीत, असे सुचित केले. त्यामुळे मूर्तीकारांचे आर्थिक संकट गडद होऊन या बंदीचा सर्वाधिक फटका पुण्या-मुंबईनंतर कोल्हापुरातील मूर्तिकारांना बसणार, हे स्पष्ट झाले आहे. मात्र बंदीच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती पावले अद्यापी उचलली गेलेली नाहीत. शिवाय गणेशमूर्ती बनवण्यासाठी पीओपीच्या बदल्यात शाडूमाती कोण देणार, याचीही जबाबदार निश्चित झालेली नाही, परिणामी मुबलक शाडूमाती न मिळाल्याने आणि पीओपी बंदीची अंमलबजावणीच न झाल्याने गणेशोत्सवासाठी कोल्हापुरातील बापट पॅम्पसह सर्व कुंभार गल्ल्यांमधील मूर्तीकारांकडून 6 महिन्यांपासून पीओपीच्याच गणेशमूर्ती बनवल्या जात आहेत.
दरवर्षी मूर्तीकारांनी बनवलेल्या लहान-मोठय़ा गणेशमूर्तींना पश्चिम महाराष्ट्रासह कोकण, बेळगाव, म्हैसूर, बेंगळूर, गोवा, आंध्र प्रदेशातून हजारो गणेशभक्त व मंडळांची मागणी असते. मागणीप्रमाणे पुरवठय़ासाठी आवश्यक शाडूमाती मिळत नसल्याने पीओपीपासून गणेशमूर्तीशिवाय मूर्तीकारांसमोर दुसरा पर्याय नाही, असे मूर्तीकार सांगत आहेत.
तीस वर्षांपूर्वी वाडी रत्नागिरी, पन्हाळगडावरील शाडूमाती मिळत होती. मात्र वन विभागाने उत्खनन, ऐतिहासिक व धार्मिक स्थळाच्या कारणावरुन तेथील शाडूमाती देण्यास बंदी घातली आहे. कोल्हापूर शहर कुंभार माल उत्पादक सहकारी सोसायटीकडून शेणगाव (ता. भुदरगड), मुंबई, रत्नागिरी, कोण्णुर, कर्नाटक व गुजरातमधून आणून दिली जाणारी शाडूमाती पुरेशी नसल्याने मूर्तीकारांना पीओपीच्याच गणेशमूर्ती तयार कराव्या लागतात, हे सत्य आहे. 18 वर्षापूर्वी गोवा सरकारने, 5 वर्षांपूर्वी कर्नाटक सरकारने तर दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र सरकारने पीओपी गणेशमूर्तीवर बंदी घातल्याने बऱयाच मूर्तीकारांनी पीओपी-शाडू मिक्स गणेशमूर्ती बनवण्याचा फंडा सुरु केला. सुदैवाने हा फंडा यशस्वी होऊन कर्नाटक, गोवा सरकारनेही पीओपी-शाडू मिक्स गणेशमूर्तीला परवानगी दिली. त्यामुळे दोन वर्षांपासून तिकडेही हजारो मूर्तीं पाठवल्या जाऊ लागल्या आहेत. मूर्तीकारांसाठी हे समाधानकारक असले तरी यंदाच्या गणेशोत्सवासाठी मात्र पीओपीच्या गणेशमूर्ती बंदीची अंमलबजावणीच न झाल्याने पीओपीच्या गणेशमूर्ती काही लाखांच्या घरात बनवल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता तरी शासन बंदी आदेश अंमलबजावणी करणार का, असा प्रश्न आहे.

Related Stories

कोल्हापूर : थकीत घरफाळा, पाणीपट्टीसाठी पाणी कनेक्शन कट करण्याच्या मोहिमेला पोलीस संरक्षणात सुरुवात

Archana Banage

कोल्हापूर : गडमुडशिंगी येथील ‘त्या’ मायलेकींची आत्महत्या नसून खून झाल्याचे उघड

Archana Banage

ऊसतोड मजुरांचे लसीकरण करा : अमल महाडिक

Abhijeet Khandekar

विठ्ठलराव पाटील महाविद्यालयाच्या गवशीतील श्रम संस्कार शिबिरास प्रारंभ

Archana Banage

क्वारंटाईन असलेल्या तरुणाचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

Archana Banage

जिवबनाना पार्कसह परिसरातील प्रलंबित मागण्यांसाठी नागरिकांचे आमरण उपोषण

Abhijeet Khandekar