कॅनडाच्या मूळ रहिवाशांवरील अत्याचाराचे प्रकरण
वृत्तसंस्था / ओटावा
पोप फ्रान्सिस हे सध्या कॅनडाच्या दौऱयावर आहेत. कॅनडातील वसतिशाळांमध्ये मूळ रहिवाशांवर झालेल्या अत्याचारातील चर्चच्या भूमिकेवरून पोप फ्रान्सिस यांनी माफी मागितली आहे. मुलांसोबत झालेल्या गैरवर्तनातील कॅथोलिक चर्चच्या भूमिकेवर मी दुःखी, संतप्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पोप फ्रान्सिस यांनी सोमवारी अल्बर्टाच्या एडमोंटनमध्ये लोकांना संबोधित करताना याप्रकरणी गांभीर्याने चौकशी करविण्याचे आश्वासन दिले आहे.
कॅनडाचे मूळ रहिवासी दीर्घकाळापासून मुलांच्या मृत्यूंप्रकरणी पोप यांनी माफी मागावी, अशी मागणी करत होते. वसतिशाळांमध्ये मूळ रहिवाशांच्या मुलांना गैरवर्तनाला सामोरे जावे लागले होते. पोप फ्रान्सिस यांनी या मूळ रहिवाशांना संबोधित केले आहे. यादरम्यान मूळ रहिवाशांना पाठिंबा दर्शविण्यासाठी त्यांनी एक हेडड्रेस देखील परिधान केला. तसेच मूळ रहिवाशांच्या मुलांच्या कब्रिस्तानचा दौरा करत तेथे प्रार्थना केली आहे.
वसतिशाळांमधील मुलांच्या मृत्यूंसाठी माफी मागतो. चर्च तसेच धार्मिक समुदायांच्या सदस्यांनी मुलांच्या अत्याचारात सहकार्य केल्याप्रकरणी माफी मागत आहे. मूळ रहिवाशांवर अनेक ख्रिश्चनधर्मीयांकडून करण्यात आलेल्या अत्याचारांप्रकरणी विनम्रपणे क्षमायाचना करत असल्याचे पोप यांनी म्हटले आहे.
मागील वर्षी कॅनडामध्ये शेकडो अज्ञात मुलांच्या दफनभूमी आढळून आल्या होत्या. वसतिशाळांमध्ये सुमारे 4 हजारांहून अधिक मुलांचा मृत्यू झाला होता. या वसतिशाळा कॅथोलिक चर्चकडून चालविण्यात येत होत्या. 19 व्या शतकाच्या प्रारंभापासून 1970 पर्यंत या शाळांमध्ये मूळ रहिवाशांच्या मुलांना आणले जायचे आणि त्यांच्यावर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा दबाव टाकला जात होता असे कॅनडाच्या सत्यशोधक आयोगाने स्वतःच्या अहवालात म्हटले होते. या भीषण वाईट कृत्यांसाठी चर्च ईश्वरासमोर गुडघे टेकत असून स्वतःच्या पापासाठी क्षमा मागत असल्याचे पोप फ्रान्सिस म्हणाले.