प्रेमात विश्वासघात झाल्याने 12 वर्षांनी तुटले नाते
पॉप स्टार शकीरा सध्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. फुटबॉलपटू गेरार्ड पिक आणि तिचे नाते संपुष्टात आले आहे. हे जोडपे 2010 पासून एकत्र राहत होते. या जोडप्याला दोन मुले देखील आहेत. गेरार्डने नात्यात फसवणूक केल्याने शकीरा आता वेगळी राहत आहेत. दोघांनीही अधिकृतपणे वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
गेरार्डला काही आठवडय़ांपूर्वी शकीराने दुसऱया महिलेसोबत पकडले होते. प्रेमात फसवणूक झाल्यापासून शकीरा गेरार्डसोबतच्या नात्यातून बाहेर पडली आहे. शकीरा हे कोलंबियातील प्रसिद्ध गायिका आहे. तिला ‘क्वीन ऑफ लॅटिन म्युझिक’ देखील म्हटले जाते. तिने वयाच्या 13 वर्षीच गायनास प्रारंभ केला होता. तिची अनेक गाणी जगभरात प्रसिद्ध झाली आहेत. तिच्या ‘वाका वाका’ या गाण्याने भारतात मोठी प्रसिद्धी मिळविली होती. गायनासोबत नृत्यातही ती अत्यंत पारंगत आहे.


2000 साली शकीरा अर्जेंटियन वकील अँटोनियो डे ला रुआसोबत नात्यात होती. 10 वर्षांपर्यंत एकत्र राहिल्यावर दोघेही वेगळे झाले होते. त्यानंतर शकीरा स्पॅनिश फुटबॉलपटू गेरार्ड पिकच्या प्रेमात पडली. गेरार्ड तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. दोघांची पहिली भेट ‘वाका वाका’ गाण्याच्या चित्रिकरणादरम्यान झाली होती.
2013 साली शकीराने पहिल्या मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर 2015 मध्ये तिने दुसऱया मुलाला जन्म दिला होता. शकीरा आणि गेरार्ड हे फोर्ब्सच्या मोस्ट पॉवरफुल कपल्सच्या यादीत सामील होते.