गायिकेवर करचोरीचा आरोप
कोलंबियन पॉप स्टार शकीरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती स्वतःच्या गाण्यामुळे नव्हे तर एका फसवणूक प्रकरणी चर्चेत आहे. स्पेनच्या न्यायालयाने करचोरीप्रकरणी शकीराची याचिका फेटाळून लावली आहे. यामुळे तिच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शकीरावर करचोरीचा आरोप पहिल्यांदा 2018 मध्ये झाला होता. त्यावेळी स्पेनच्या वकिलांनी 2011-2014 दरम्यान मिळविलेल्या उत्पन्नावर सुमारे 1.55 कोटी डॉलर्स म्हणजेच 120 कोटी रुपयांचा कर तिने भरलेला नसल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी शकीरा जून 2019 मध्ये न्यायालयात हजर राहिली होती. तिने कुठल्याही प्रकारची करचोरी केली नसल्याचा दावा केला होता. कर कार्यालयाकडून माहिती मिळताच पैसे जमा केले होते असे तिचे म्हणणे होते.
शकीराने कर न भरल्याचा आणि नियमांचे पालन केले नसल्याचे पुरेसे पुरावे आहेत. अशा स्थितीत तिच्या विरोधात खटला चालविला जाऊ शकतो. तिच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास तिला शिक्षा होऊ शकते. यात शकीराला तुरुंगवासासह दंडही भरावा लागू शकतो असे न्यायालयाने म्हटले आहे.