Tarun Bharat

लहरी पावसाची आबादानी

यंदाचा मान्सून देशवासियांसाठी दमदार ठरला असून, सर्वत्र जोरदार पावसाची नोंद झाली आहे. 1 जून ते 8 सप्टेंबरच्या कालावधीत सरासरीच्या 5 टक्के अधिक पाऊस झाला असून, अनेक राज्ये पाणीदार झाली आहेत. देश तसेच राज्यातील धरणसाठाही मोठय़ा प्रमाणात वाढल्याने पाण्याचा प्रश्नही मिटला आहे. कमी कालावधीत जोरदार पाऊस, मधल्या काळात खंड, दिवसभर उन्हाचा तीव्र चटका, संध्याकाळी गडगडाटी वादळी पाऊस, अशी काहीशी वैशिष्टय़े यंदाच्या मान्सूनची दिसून येत आहेत. जागतिक तापमानवाढ व त्यामुळे होत असलेले वातावरणातील बदल आता पुढे येत असून, मान्सूनवरही त्याचा परिणाम दिसण्यास ठळकपणे दिसण्यात सुरुवात झाली आहे.

उन्हाळा, पावसाळा व हिवाळा असे तीन मुख्य ऋतू मानले जातात. यंदाचे वर्ष हे हवामानाच्या दृष्टीने अनेकार्थाने वैशिष्टय़पूर्ण ठरले असून, मागचे दोन महिने पावसाने खऱया अर्थाने गाजवले आहेत. अनेक भागांत त्याने दाणादाण उडविली असून, जूनची तूटही भरून काढली आहे. पावसाळय़ाचा आधीचा उन्हाळाही असाच तीव्र राहिलेला आहे.

रेकॉर्डबेक उन्हाळा

यावर्षी मार्चपासूनच देश तापायला सुरुवात झाली. मार्च महिन्यातही रेकॉर्डब्रेक कमाल तापमान नोंदविण्यात आले. मार्च, एप्रिल तसेच मे महिन्यात राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, बिहार, झारखंड, विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेने लाही लाही केली. कमाल तापमान 48 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. दुसरीकडे उत्तराखंड, हिमाचल प्रदेश तसेच जम्मू काश्मीरमध्येही उष्णतेच्या लाटेच्या झळा पसरल्या. या भागात कमाल, किमान तसेच सरासरी तापमान वाढलेले होते. त्यामुळे थंड हवेच्या ठिकाणांना यंदा चांगलाच उकाडा जाणवला. महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा तसेच विदर्भात उष्णतेच्या झळा जाणवल्या. त्यातही विदर्भात कित्येक दिवस उष्णतेच्या लाटांचा मारा होता. चंद्रपूर, अकोला येथे भारतातील सर्वाधिक तापमान नोंदविण्यात आले. येथील पारा 46 ते 47 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला.

पाकिस्तानात रेकॉर्डब्रेक उन्हाळा व पावसाळाही

यावर्षी पाकिस्तान तसेच भारतामध्ये उष्णतेच्या झळा तीव्र होत्या. मे महिन्यात अतीतीव्र उष्णतेच्या लाटा सुरू होत्या. त्यातच पाकिस्तानातील जकोबाबाद या भागात 14 मे रोजी 50 अंश सेल्सिअसइतक्या आतापर्यंतच्या सर्वांत जास्त जागतिक तापमानाची नोंद झाली. ऑस्ट्रेलियाच्या अनेक भागातही उष्णतेची लाट नोंदविण्यात आली. दुसरीकडे ऑगस्ट तसेच सप्टेंबर महिन्यात मान्सूनने अक्षरशः पाकिस्तानला झोडपून काढले असून, यामुळे मोठय़ा प्रमाणात काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक खेडी उद्ध्वस्त झाली असून, लोकांना स्थलांतर करावे लागत आहे. यामुळे पाकिस्तानयच्या अर्थव्यववस्थेवरही परिणाम झाला आहे.

मार्च, एप्रिल 122 वर्षांतील सर्वांत उष्ण महिने

भारतासारख्या देशाचा विचार करता येथील मार्च महिना 122 वर्षांतील सर्वांत उष्ण महिना ठरला असून, मार्चमध्ये या कालावधीतील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असल्याची माहिती भारतीय विभागाकडून देण्यात आली आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे हे चार महिने प्रामुख्याने उन्हाळय़ाचे मानतात. मार्चपासून खऱया अर्थाने उन्हाळा जाणवण्यास सुरुवात होत असते. परंतु, 2022 चा उन्हाळा मागच्या शतकभरातील उन्हाळय़ापेक्षा कितीतरी तीव्र असल्याचे समोर आले आहे. मार्चमध्ये देशातील अनेक भागात 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाल्याचे दिसून आले. गेल्या महिन्यात (मार्च 2022) सरासरी मासिक दिवसाच्या तापमानाचा पारा 33.1 अंशांवर नोंदवला गेला. हे 1901 सालानंतरचे महिन्यातील सर्वांत उष्ण तापमान ठरले आहे. याशिवाय यंदाचा एप्रिल महिना हा गेल्या 122 वर्षांतील चौथा सर्वाधिक तापमानाचा महिना ठरला आहे. या महिन्यात कमाल तसेच सरासरी तापमान 35.05 सेल्सिअस नोंदविण्यात आला आहे, तर एप्रिल महिन्यातील वायव्य व मध्य भारतातील कमाल तापमानाची सरासरीही गेल्या 122 वर्षातील सर्वाधिक नोंदविण्यात आली आहे. या कालावधीत वायव्य भारतात 35.90 अंश सेल्सिअस, तर मध्य भारतात 37.78 अंश सेल्सिअस इतके तापमान होते.

मान्सूनची गुड न्यूज; सरासरीच्या 99 टक्के पाऊस ः

यंदाचा जून ते सप्टेंबर या कालावधीतील मान्सून सरासरीच्या 99 टक्के बरसणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. देशातील पूर्वोत्तर भाग तसेच तुरळक भाग वगळता सर्वत्र यंदा दमदार पाऊस होणार आहे. यामुळे पिकपाण्यासह सर्व क्षेत्रात याचा सकारात्मक परिणाम जाणवणार असल्याचे सांगण्यात आले होते. भारतीय हवामान विभाग दरवर्षी एप्रिल महिन्यात मान्सूनचा पहिला दीर्घकालीन अंदाज जाहीर करते, यानंतरचा दुसऱया टप्प्यातील  अंदाज मे महिन्यात देण्यात आला. जून ते सप्टेंबरच्या कालावधीत 87 मिमी इतका पाऊस होतो. या अंदाजानुसार सरासरीच्या 99 टक्के पाऊस होणार असून, यात पाच टक्के कमी अधिकता राहील, असे सांगण्यात आले होते. मात्र, हा अंदाज दुसऱया दीर्घकालीन अंदाजात 103 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आला. साउथ एशियन क्लायमेट आऊटलूक फोरम (सासकॉफ)नेही आपल्या वार्षिक परिषदेचा अहवाल जाहीर केला असून, या अहवालानुसार, जून ते सप्टेंबर या कालावधीत भारत, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, पूर्व म्यानमार, उत्तर श्रीलंकेच्या भागात सरासरीहून अधिक पाऊस होईल. उत्तर अफगाणिस्तानचा काही भाग, बांग्लादेशचा अर्ध्याहून अधिक भाग, म्यानमारचा दक्षिणेचा भाग, श्रीलंकेचा दक्षिण भाग, मालदीवच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील, असे म्हटले. त्यानुसार पावसाची वाटचाल दिसून येत आहे.

मान्सूनचे आगमन लवकर

जितका उन्हाळा कडक तितकेच पावसाचे प्रमाणही अधिक असे समीकरण मानले जाते. यावर्षी कमी कालावधीतच जोरदार मान्सूनच्या सरी बरसल्या आहेत. यंदा मान्सून 16 मे रोजी अंदमानात, तर 29 मे रोजी केरळात दाखल झाला. त्यानंतर लवकरच 2 जुलैच्या आसपास मान्सूनने संपूर्ण देश व्यापला. सर्वसाधारणपणे 8 जुलैला देश व्यापणाऱया मान्सूनने यंदा आठवडाभर आधीच देश काबीज केला आहे. त्यानंतर त्याच्या प्रवासात चढउतार पहायला मिळतो.

जूनमध्ये तूट ; जुलै-ऑगस्टने भरुन काढली कसर

मान्सूनचे आगमन देशात लवकर झाले असले तरी जून महिन्यात पाऊस आपली सरासरी गाठू शकला नाही. या महिन्यात सरासरीच्या उणे आठ टक्के पाऊस झाला, त्यानंतर मात्र जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. 1 जुलै ते 31 जुलैच्या कालावधीत सरासरीच्या 16 टक्के अधिक पाऊस नोंदविण्यात आला. ऑगस्ट महिन्यातही सरासरीपेक्षा 3 टक्के अधिक पाऊस झाला आहे. सप्टेंबरच्या महिन्याच्या कालावधीतही सरासरीच्या पावसाचा अंदाज आहे. 1 जून ते 9 सप्टेंबरच्या एकत्रित कालावधीचा विचार करता, आतापर्यंत देशभरात सरासरीच्या 5 टक्के अधिकचा पाऊस नोंदविण्यात आला आहे. दक्षिण भारत तसेच मध्य भारतावर यंदा पावसाचा फोकस जास्त होता. या दोन्ही विभागात सरासरीच्या अधिक पाऊस झाला आहे, तर वायव्य भारत, पूर्व वपूर्वोत्तर भारतात अद्यापही पावसाची तूट आहे. ही तूट आगामी काळात भरुन निघण्याची आशा आहे.

तापमानवाढीचा फटका

जागतिक तापमान व त्यामुळे वातावरणात होत असलेल्या बदलांचा मान्सूनवरही परिणाम होताना दिसत आहे. मोठे खंड, कमी कालावधीत मुसळधार बरसणारा पाऊस, उन्हाचा चटका या गोष्टी संपूर्ण मान्सूनभर देशवासियांना अनुभवण्यास मिळत आहेत. महाराष्ट्रात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक पिकांना याचा फटका बसला. ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आली, तर ऑस्ट्रेलियातील उष्णतेची लाट, आसामचा पूर, बेंगळूरमध्ये कमी कालावधीत झालेला मुसळधार पाऊस, पाकिस्तानील पूरस्थिती, चीनमध्ये आलेली उष्णतेची लाट यामुळे आता वातावरणातील बदल मोठय़ा प्रमाणात जाणवत आहेत. अडविलेले नैसर्गिक पाण्याचे प्रवाह, वेगाने होत असलेले शहरीकरण, मोठय़ा प्रमाणात होत असलेली वृक्षतोड, मानवी आक्रमण आदी चुकांचे परिणाम आता दिसण्यास सुरुवात झाली आहे.

भारतासारखा देश हा प्रामुख्याने मान्सूनवर अवलंबून आहे. जूनचा अपवाद मागचे दोन महिने दणकून पाऊस झाला आहे. सप्टेंबरातही अतिवृष्टीचा अंदाज असून, मागच्या आठ दिवसांत पावसाने अनेक भागांत आपले रौद्ररूप दाखवून दिले आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यांतील धरणे काठोकाठ भरली आहेत. काही ठिकाणी शेतीचे नुकसान झाले असले, तरी कृषी क्षेत्रात सुगीचे दिवस पहायला मिळू शकतात. मान्सून, शेतीचा अर्थव्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम होत असतो. हे पाहता पावसाच्या कृपेने देशात आबादानी पहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.

– अर्चना माने-भारती, पुणे

Related Stories

पुन्हा एकदा वाढले लखनऊमधील प्रदूषण

Tousif Mujawar

पानिपत योद्धे आणि श्रीमंत नानासाहेब पेशवे यांना दीपोत्सवातून मानवंदना

Tousif Mujawar

‘कै. पं. शंकर विष्णू कान्हेरे स्मृती समारोहा’चे रविवारी आयोजन

prashant_c

प्राचीन काळातील मगरी दोन पायावर चालणाऱ्या आणि पळणाऱ्याही

datta jadhav

पुणे : ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ या विषयावर उद्या राज्यस्तरीय वेबिनार

Tousif Mujawar

पारंपरिक वेषातील महिलांचा योगासनातून आरोग्य जागर

Tousif Mujawar
error: Content is protected !!