ऑनलाईन टीम/तरुण भारत
पोर्तुगालमध्ये (Portugal) पर्यटनासाठी गेलेल्या एका भारतीय गर्भवती महिलेचा मृत्यू (pregnant Indian woman dies) झाला आहे. महिलेच्या मृत्यूनंतर पोर्तुगालमध्ये एकच खळबळ माजली आहे. तर महिलेच्या मृत्यूनंतर पोर्तुगालच्या आरोग्यमंत्री मार्टा टेमिडो (Marta Temido) यांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून आरोग्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, लिस्बन येथे या महिलेला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर या भारतीय महिलेचा रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्यानं दुसऱ्या रुग्णालयात नेलं जात असताना मृत्यू झाला. (Portugal Health Minister quits after pregnant Indian woman dies)
दरम्यान, भारतीय गर्भवती महिला पोर्तुगालमध्ये पर्यटनासाठी गेली होती. तिला प्रसुती कळा जाणवू लागल्याने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, प्रसुती कक्षात तिला बेड उपलब्ध झाला नाही. त्यामुळे दुसऱ्या रुग्णालयात जात असताना तिची प्रसुती झाली. मात्र, त्याच काळात तिला हृदयविकाराचा झटका आला, यामध्ये या महिलेचा मृत्यू झालाय. यांनतर पोर्तुगालच्या आरोग्य मंत्री मार्टा टेमिडो यांनी राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा पंतप्रधानांनी स्वीकारला आहे. आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून पदावरून पायउतार झाल्याने भारतीय नेत्यांमध्ये अशी नैतिकता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे.
पोर्तुगालमध्ये इमर्जन्सी सेवा बंद केली असल्याने, तसंच रुग्णालयांमधील डॉक्टरांचा तुटवडा आणि गर्भवती महिलांना योग्य सेवा मिळत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून आरोग्यमंत्र्यांवर टीका केली जात होती. आता हे प्रकरण समोर आल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ माजली. नेटकऱ्यांनी पोर्तुगाल सरकारवर टीकास्त्र सोडलं. वाढता जनरोष पाहता आरोग्यमंत्री मार्टा यांनी राजीनामा दिला आहे. त्या २०१८ पासून देशाच्या आरोग्यमंत्री होत्या. कोरोना काळात त्यांनी चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधानांनी त्यांच्या कोरोना काळातील कामगिरीबाबत त्यांचं कौतुक केलं तर, देशातील आरोग्यव्यवस्था आणखी चांगली करण्याचे आश्वासन दिलं.