प्रतिनिधी / पणजी
शेजारील राज्यांमध्ये वीज संकट निर्माण झाल्याने तिथे लोड शेडिंग सुरू झालेले आहे. त्याचवेळी गोव्यात प्रचंड उकाडय़ामुळे दिवसाकाठी 50 ते 70 मॅगाव्हॅट विजेची मागणी वाढल्याने वीज खात्यासमोर गंभीर प्रसंग निर्माण झालेला आहे. शक्य तो गोव्यात लोड शेडिंग होऊ नये, यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करणार, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश इत्यादी राज्यांमध्ये वीज टंचाई सुरू झाली आहे. या सर्व राज्यामंध्ये सध्या लोड शेडिंग टप्प्याटप्प्याने केले जात आहे. त्याचा परिणाम गोव्यावर होण्याची शक्यता वाढली आहे.
निर्मितीच्या ठिकाणीच वीज कमी
गोव्याला मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकातून वीज मिळते. गोव्याला केंद्राने निश्चित केलेला वीज पुरवठा गोव्याला मिळतोय. मात्र ज्या ठिकाणी वीज उत्पादन होतेय त्या ठिकाणीच वीज निर्मितीचे प्रमाण कमी झाले असेल तर गोव्याला आवश्यक तेवढा मुबलक वीजपुरवठा प्राप्त होईल की नाही, याबाबत साशंकता वाढलेली आहे.
गोव्यातील जनतेने काळजी करू नये
या पार्श्वभूमीवर वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की सध्या तरी गोव्यातील जनतेने काळजी करू नये. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. वीज अधिकाऱयांना देखील एकंदरीत आढावा घेण्यास सांगितलेले आहे. 25 एप्रिलपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
गोव्यात 50 ते 70 मॅगाव्हॅटची मागणी वाढली
गोव्यात सध्या मोठय़ा प्रमाणात उकाडा असल्याने दररोज राज्यात 50 ते 70 मॅगाव्हॅट वीज मागणी वाढली आहे. मोठय़ा प्रमाणात पर्यटक गोव्यात असल्याने हॉटेलांमध्येही वीज मागणी वाढली आहे. असहय़ उकाडय़ामुळे घरोघरी दोन दोन वा चार पंखे लावले जातात. शिवाय कित्येक घरांमध्ये वातानुकुलीत यंत्रणा बसविण्यात आल्यानेही विजेची मागणी वाढलेली आहे.
गोवा अतिरिक्त वीज खरेदी करणार : वीजमंत्री
गोव्याला मिळत असलेली वीज आणि सध्याची वाढती मागणी यावर उपाय म्हणून वीज खाते काही प्रमाणात अतिरिक्त वीज खरेदी करणार आहे. लोड शेडिंगची समस्या गोव्यात भेडसावणार नाही. याचा अर्थ गोव्यावर वीज कपातीचे संकट नाही अशातला भाग नाही. मात्र अशी समस्या उद्भवू नये यासाठी आमचा प्रयत्न आहे, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.