लष्करप्रमुख मनोज पांडे यांच्यासह विविध लष्कर अधिकारी उपस्थित राहणार
प्रतिनिधी /बेळगाव
कर्तव्य, मान आणि साहस या त्रिसूत्रीवर आधारित अतुलनीय पराक्रमाची अडीचशे वर्षांची वैभवशाली परंपरा असणाऱया मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे दि. 15 ते 17 ऑक्टोबर दरम्यान 17 वा युद्धोत्तर पुनर्मिलन सोहळा (पोस्टवॉर री-युनियन) साजरा होणार आहे. या सोहळय़ाला लष्करप्रमुख मनोज पांडे (एव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसीएसएम) यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
सिनर्जी हे या सोहळय़ाचे घोषवाक्मय आहे. लष्कर, नौदल, हवाईदल व तटरक्षक दलाच्या सर्व सलग्न युनिट्समधील सौहार्द हा सोहळा अधोरेखित करतो. या प्रसंगी लष्करप्रमुखांसह माजी लष्करप्रमुख जनरल जे. जे. सिंग, अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल व रेजिमेंटचे मानद कर्नल लेफ्टनंट कर्नल अजय सिंग, मेजर जनरल के. नारायणन्, भारत सरकार संरक्षण मंत्रालय, लष्करी व्यवहार विभाग आणि रेजिमेंटचे कर्नल तसेच सेवारत आणि निवृत्त लेफ्टनंट जनरल, मेजर जनरल, कोल्हापूर व तंजावरचे राज घराणे, इन्फंट्रीचे सेवानिवृत्त अधिकारी, कनिष्ट आयोगाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तिन्ही दलातील सिनर्जीचे प्रतीक असलेली स्मरणार्थ परेड हा या सोहळय़ाचा पहिला कार्यक्रम आहे. यामध्ये सात तुकडी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बॉम्बे इंजिनीअर ग्रुप, 34 मेडियम रेजिमेंट, 36 मेडियम रेजिमेंट, आयएनएस मुंबई, 20 स्वॉड्रक इंडियन एअरफोर्सचे प्रतिनिधित्व करणारी एकरमन टेनिंग स्कूल सांबरा, इंडिया स्टेशन (दमण) यांचा समावेश आहे. त्यामध्ये लष्कराचा सिल्व्हर बॅण्ड सहभागी होणार असून इन्फंट्रीच्या दुसऱया बटालियन्सचे अधिकारी मेजर शाश्वत दाबास या परेडचे नेतृत्व करणार आहेत. त्यानंतर अंदमान आणि निकोबार कमांडरीन इन चीफ लेफ्टनंट कर्नल अजयसिंग यांच्या हस्ते शर्कत युद्ध स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात येईल. मातृभूमीसाठी बलिदान करणाऱयांचे स्मरण आणि मराठा रेजिमेंटचा इतिहास याद्वारे दाखविला जाणार आहे. मराठा रेजिमेंटच्या भरती क्षेत्रातील विविधतेचे दर्शन घडविणारी लोकनृत्ये यावेळी होणार आहेत.
मराठा लाईट इन्फंट्री ही भारतीय सैन्यातील एक उत्कृष्ट व जुनी रेजिमेंट आहे. या इन्फंट्रीला उज्ज्वल असा वारसा वाढलेल्या बॉम्बे शिपायांचा ती वारसा सांगते. मेसापोटेमिया मोहिमेमध्ये मराठा बटालियन्सने अद्वितीय कामगिरी केली. दुसऱया महायुद्धात ही इन्फंट्री प्रत्येक थिएटर ऑफ ऑपरेशन्समध्ये आघाडीवर होती. स्थापनेपासून या रेजिमेंटला 52 लढाऊ सन्मानांनी सन्मानित करण्यात आले आहे.
12 थिएटर्स ऑनर्स सन्मान, 2 व्हिक्टोरिया क्रॉस, 5 अशोकचक्र, 2 पद्मभूषण, 31 परमविशिष्ट सेवा पदक, 5 महावीर चक्र, 15 किर्ती चक्र, 2 पद्मश्री, 44 वीर चक्र, 65 शौर्य चक्र, 421 सेना मेडल, 28 शौर्य पुरस्कार या रेजिमेंटला प्राप्त आहेत. या रेजिमेंटच्या शिपायांनी ऑलिम्पिक, आशियायी, राष्ट्रकुलसह इतर जागतिक स्पर्धा व राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात अर्जुन पुरस्कारासह विविध पदके पटकाविली आहेत.