5 वर्षांपासून वधूचा घेतोय शोध
भारतात सध्या विवाह जमविणे अत्यंत अवघड ठरले आहे. अनेक युवकांना योग्य जोडीदार मिळत नसल्याची स्थिती आहे. अशा स्थितीत काही जण मॅरेज ब्युरोची मदत घेत आहेत, तर काही मॅरेज वेबसाइट्सद्वारे जोडीदार शोधत आहेत. परंतु काही युवक अत्यंत अनोखी पद्धत अंमलात आणत आहेत. अशीच एक अनोखी पद्धत तामिळनाडूतील एका युवकाने वापरली आहे. वधूचा शोध घेत अनेक वर्षे वाया गेल्यावर त्याने स्वतःची पोस्टर्स शहरात झळकविली आहेत.
तामिळनाडूच्या मदुराईतील विलुपुरम येथील रहिवासी 27 वर्षीय जगन आयटी प्रोफेशनल आहे. मागील अनेक वर्षांपासून तो स्वतःसाठी वधू शोधत आहे. परंतु अद्याप त्याला परफेक्ट जोडीदार मिळालेला नाही. याचमुळे त्रस् होत त्याने स्वतःच्या विवाहासाठी शहरांमधील चौकांच्या ठिकाणी जाहिरातीचे पोस्टर्स झळकविले आहेत. ‘मिस राइट’चा शोध असल्याचे त्याने या पोस्टरवर नमूद केले आहे.
या पोस्टरमध्ये जगनने स्वतःशी निगडित माहिती दिली आहे. या पोस्टरवर त्याचे एक छायाचित्र देखील आहे. तसेच स्वतःच्या वेतनाची माहितीही देण्यात आली आहे. आपण डिझाइनर असून बीएससी आयटीचे शिक्षण घेतले आहे. एका खासगी कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करतो, तर महिन्याला सुमारे 40 हजार रुपयांचा पगार असल्याचे सांगत जगनने स्वतःच्या नावावर असलेल्या जमिनीची माहिती दिली आहे.
मी मागील 5 वर्षांपासून योग्य जोडीदाराचा शोध घेत आहे. परंतु अद्याप यात मला यश मिळालेले नाही. अशा स्थितीत आता मी अनेक पोस्टर्स डिझाइन केली आहेत. लोक याबद्दल माझी थट्टा करतात. परंतु मला याची पर्वा नाही. अनेक लोकांनी वधू शोधण्याचे आश्वासन देत पैशांसोबत कुंडलीही घेतली, परंतु ते कधीच परत आले नसल्याचे जगनचे सांगणे आहे.