न्यायालयात धाव घेतल्याने संख्या कमी होण्याची शक्यता
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेचे 186 गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. मात्र यापैकी आणखी काही गाळेधारकांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यापैकी आणखी काही गाळय़ांचा लिलाव स्थगित ठेवण्याची वेळ महसूल विभागावर आली आहे. त्यामुळे गाळय़ांची संख्या कमी होण्याची शक्मयता आहे.
महापालिकेचे गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी आयोजित केलेल्या लिलाव प्रक्रियेविरोधात आक्षेप घेऊन न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे 268 गाळय़ांचा लिलाव स्थगित ठेवण्यात आला होता. मात्र न्यायालयातील सुनावणीवेळी महापालिकेच्या वकिलांनी युक्तिवाद करून लिलाव प्रक्रिया राबविण्यास परवानगी मागितली होती. याची दखल घेत न्यायप्रविष्ट गाळे वगळून उर्वरित गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्याची सूचना न्यायालयाने केली आहे. त्यामुळे न्यायप्रविष्ट असलेले गाळे वगळून 186 गाळय़ांचा लिलाव करण्यासाठी महापालिकेकडून प्रकटन प्रसिद्ध करण्यात आले आहे. मात्र आणखी काही गाळेधारक न्यायालयात गेले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
स्थगिती आदेशाची प्रत सादर
महापालिकेला माहिती नसल्याने त्या गाळय़ांचा समावेश लिलाव प्रक्रियेत करण्यात आला होता. पण गाळेधारकांनी महापालिकेत धाव घेऊन न्यायालयाच्या स्थगिती आदेशाची प्रत सादर केली आहे. त्यामुळे 186 पैकी आणखी काही गाळय़ांचा लिलाव स्थगित ठेवावा लागणार आहे.