प्रतिनिधी /बेळगाव
पूर्वी तार, मनीऑर्डर, राख्या व पत्र पाठविणे एवढय़ापुरता पोस्ट विभाग कार्यरत होता. परंतु आता काळानुरुप पोस्ट विभाग डिजिटल होताना दिसत असून, ग्राहकांना नवनवीन सेवा देण्याचा प्रयत्न पोस्टाकडून केला जातो. बेळगाव पोस्ट विभागाकडून पार्सल डिलिव्हरी, इंडियन पोस्ट पेमेंट बँक, पोस्ट विमा, पासपोर्ट सेवा केंद्र, आधारकार्ड तयार करणे अशा अनेक सुविधा दिल्या जात आहेत. त्यामुळे पोस्ट विभागाने कात टाकली असून डिजिटल सेवा दिल्या जात आहेत.
मध्यंतरीच्या काळात केवळ टपाल आणि मनीऑर्डर यावर अवलंबून राहिल्याने पोस्ट विभाग पिछाडीवर पडले. यामुळेच खासगी पार्सल व कुरिअर सेवा जोमाने सुरू झाली. त्यामुळे सध्याच्या डिजिटल युगात पोस्ट विभाग तग धरतो की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यातच पोस्ट विभागाने आपल्या कक्षा रुंदावण्यास सुरुवात केली. आता कुरिअर कंपन्यांच्या तोडीस तोड सेवा पोस्टाकडून दिली जात आहे. रविवार दि. 9 रोजी जागतिक टपाल दिन साजरा करण्यात आला. त्यामध्येही डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देण्यात आले.
बँकिंग सेवेतही अग्रेसर
यापूर्वी आरडी व किसान विकास पत्र या पुरताच पोस्ट विभाग मर्यादित होता. परंतु डिजिटल इंडियाच्या माध्यमातून इंडियन पोस्ट पेमेंट बँक सुरू करण्यात आली. कोणतेही पासबूक नसताना अथवा कागदपत्रांची जमवाजमव नसताना केवळ आधारकार्डच्या माध्यमातून आयबीपीएस खाते काढता येते. अवघ्या पाच मिनिटांमध्ये बँक खाते उघडले जात असून, सरकारच्या योजनांची रक्कमदेखील या खात्यांवर जमा होऊ शकते. मोबाईलच्या माध्यमातून लाईट बिल भरणे, मोबाईल रिचार्ज करणे या सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पोस्ट विभागाच्या सहकार्याने बेळगावमध्ये कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयाच्या आवारात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात आले. यामुळे पासपोर्ट काढण्यासाठी हुबळी येथे होणारी धावपळ कमी झाली. नागरिकांना बेळगावमध्येच पासपोर्टच्या सुविधा उपलब्ध होऊ लागल्या आहेत. सध्या दररोज 70 ते 80 नागरिकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. शिक्षण, नोकरी व व्यवसायासाठी परदेशी जाणाऱयांना हा एक महत्त्वाचा दस्तावेज असल्यामुळे पासपोर्ट काढणाऱयांची संख्याही वाढली आहे.
कुरिअर सेवेत बेळगाव अव्वल
खासगी कुरिअर कंपन्यांच्या तोडीस तोड सेवा पोस्टाकडून दिली जाते. बेळगाव शहर विभागात येणाऱया पार्सल डिलिव्हरी सेवा दिली जाते. पोस्ट विभागाने यासाठी स्वतंत्र विभाग तयार केला असून, वाहनांतून पार्सल घरोघरी पोहोचविली जातात. पोस्टाच्या सेवा विश्वासार्ह असल्यामुळे पोस्टल सेवेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
ग्राहकांचा ओढा पोस्टाकडे
पोस्टाने डिजिटल प्लॅटफॉर्मवर सेवा देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे ग्राहकांचा ओढा पोस्टाकडे आहे. यावषी पोस्टल सप्ताहानिमित्त रक्तदान शिबिर घेतले जाणार असून, अधिकाधिक नागरिकांना रक्तदान करण्याबाबत जागृती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
– विजय नरसिंह (पोस्ट अधीक्षक)