Tarun Bharat

स्टीव्ह स्मिथ, लाबुशेन यांची दमदार द्विशतके

वृत्तसंस्था /पर्थ

यजमान ऑस्ट्रेलिया आणि विंडीज यांच्यात येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीतील खेळाच्या दुसऱया दिवशी ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव 152.4 षटकात 4 बाद 598 धावांवर घोषित केला. त्यानंतर विंडीजने दिवसअखेर 25 षटकात बिनबाद 74 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात स्टीव्ह स्मिथ आणि लाबुशेन यांनी दमदार द्विशतके झळकविली. लाबुशेनने 1 षटकार आणि 20 चौकारांसह 204 तर स्टीव्ह स्मिथने 311 चेंडूत 17 चौकारांसह नाबाद 200 धावा जमविल्या. हेडचे शतक केवळ एका धावेने हुकले.

ऑस्ट्रेलियाने 2 बाद 293 या धावसंख्येवरून दुसऱया दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. लाबुशेन आणि स्मिथ यांनी विंडीजच्या गोलंदाजीच्या मर्यादा उघडय़ा करताना तिसऱया गडय़ासाठी 269 धावांची भागीदारी केली. चहापानानंतर ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव घोषित केला. लाबुशेनला विंडीजकडून जीवदाने मिळाली. या जीवदानाचा लाभ घेत त्याने आपले द्विशतक झळकविले. लाबुशेनने आपल्या पहिल्या दिवसाच्या 154 या धावसंख्येमध्ये 50 धावांची भर घातली. ब्रेथवेटने त्याला डिसिल्वाकडे झेल देण्यास भाग पाडले. लाबुशेनने 2020 साली सिडनीत न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या कसोटीत 215 धावा झळकविल्या होत्या. त्याचे हे कसोटीतील तिसरे द्विशतक आहे.

स्टीव्ह स्मिथने हेड समवेत चौथ्या गडय़ासाठी 196 धावांची भर घातली. स्मिथची खेळी निर्दोष होती. अलीकडेच इंग्लंड विरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत स्मिथने 94 आणि नाबाद 80 धावा झळकविल्या होत्या. विंडीज विरुद्धच्या या कसोटीत स्मिथने आपले कसोटीतील 29 वे शतक 194 चेंडूत पूर्ण करत ऑस्ट्रेलियाचे माजी महान क्रिकेटपटू सर डोनाल्ड ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. दिवंगत ब्रॅडमन यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 29 शतके 52 कसोटीत तर स्मिथने 29 शतके 88 कसोटीत झळकविली. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकविणाऱया फलंदाजांच्या यादीत स्मिथ संयुक्त चौदाव्या स्थानावर आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर 51 शतकांसह या यादीत पहिल्या स्थानावर आहे. तब्बल सात वर्षांनंतर विंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ही कसोटी मालिका खेळविली जात आहे. टेविस हेडने 95 चेंडूत 11 चौकारांसह 99 धावा जमविल्या. शतकाला केवळ एक धाव बाकी असताना ब्रेथवेटने त्याचा त्रिफळा उडविला. स्मिथचे द्विशतक पूर्ण झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपला डाव घोषित केला. त्यानंतर दिवसअखेर विंडीजने सावध फलंदाजी करत 25 षटकात बिनबाद 74 धावा जमविल्या. चंद्रपॉल 1 षटकार आणि 6 चौकारांसह 47 तर कर्णधार पेग ब्रेथवेट 1 चौकारासह 18 धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये पेग बेथवेटने 2 तर मेयर्स आणि सिलेस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

ब्रॅडमनच्या विक्रमाशी स्मिथची बरोबरी

ऑस्ट्रेलियाचे माजी महान क्रिकेटपटू दिवंगत सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 52 कसोटीत 29 शतके झळकविण्याचा विक्रम नोंदविला होता. स्टीव्ह स्मिथने विंडीज विरुद्धच्या पहिल्या कसोटीत आपले 29 वे शतक झळकवित  ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया प. डाव 152.4 षटकात 4 बाद 598 (डाव घोषित), (वॉर्नर 5, ख्वाजा 65, लाबुशिने 204, स्टीव्ह स्मिथ नाबाद 200, हेड 99, पेग ब्रेथवेट 2-65, सिलेस 1-95, मेयर्स 1-39), विंडीज 25 षटकात बिनबाद 74 (ब्रेथवेट खेळत आहे 18, चंद्रपॉल खेळत आहे 47).

Related Stories

लडाखची मक्सूमा विराटची चाहती

Patil_p

कलेढोण येथे दोघांवर तलवारीने हल्ला

Patil_p

चेन्नईकडून दिल्लीचा 91 धावांनी धुव्वा,

Patil_p

कसोटी मालिकेत भारताची विजयी सलामी

Patil_p

एनआरआयकडून श्रीजेशला 1 कोटी प्रदान

Patil_p

वेटलिफ्टर मिराबाई चानूच्या पूर्वतयारीला प्रारंभ

Amit Kulkarni