वार्ताहर /कुडचडे
कुडचडे येथील चंद्रभागा तुकोबा नाईक उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘तिरंगा यात्रा’ प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. या फेरीला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले कुडचडेचे पोलीस निरीक्षक वैभव नाईक यांनी ध्वज फडकावून प्रारंभ केला. यावेळी चंद्रभागा उच्च माध्यमिक विद्यालय संस्थेचे अध्यक्ष अशोक नाईक, संस्थेचे इतर सदस्य, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष किशोर गावस देसाई, प्रभारी प्राचार्य श्रीपाद भट, ज्येष्ठ शिक्षक व्यंकटेश नायक, अन्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
यावेळी स्वातंत्र्यसैनिकांच्या वेषभूषेत विद्यार्थ्यांनी हातात राष्ट्रध्वज घेऊन विविध घोषणा देत प्रभातफेरी काढली. यामुळे कुडचडे परिसर घोषणांनी दुमदुमून गेला. नागरिकांकडूनही फेरीला चांगला प्रतिसाद मिळाला. ही प्रभातफेरी विद्यालय ते कुडचडे बाजार अशी फिरून पुन्हा विद्यालयाकडे आली. त्यानंतर विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रभारी प्राचार्य श्रीपाद भट, प्रभारी उपप्राचार्य व्यंकटेश नायक, अन्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यालयाच्या 18 पथकांनी स्पर्धेत भाग घेतला. परीक्षण व्यावसायिक शाखेचे शिक्षक तुळशीदास पोपकर, कारकून सत्यवान नाईक, भौतिकशास्त्र प्रयोगशाळा साहाय्यक सुप्रिया नाईक यांनी केले. स्पर्धेत अकरावी कला अ वर्ग (प्रथम), अकरावी विज्ञान अ वर्ग (द्वितीय), अकरावी कला ब वर्ग (तृतीय), बारावी विज्ञान ब वर्ग आणि बारावी म्रिडा (उत्तेजनार्थ) यांना बक्षिसे प्राप्त झाली. विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व बक्षिसे देण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका मनीषा उपाध्ये यांनी केले.