पुणे / प्रतिनिधी :
संत साहित्याचे आणि लोकवाङ्मयाचे व्यासंगी अभ्यासक, व्याख्याते, प्रवचनकार आणि भारूडकार डॉ. रामचंद्र देखणे (Ramchandra Dekhne) यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे.
रामचंद्र देखणे हे पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या कार्यालयात जनसंपर्क अधिकारी होते. ३४ वर्षांच्या नोकरीनंतर ते २०१४ मध्ये निवृत्त झाले होते. देखणे यांच्या घरी वारकरी संप्रदायाची परंपरा होती. वडिलांच्या कीर्तनात ते लहानपणी अजाणतेपणी टाळकरी म्हणून उभे रहात आणि खड्या आवाजात अभंगातली चरणे म्हणत. त्यामुळे कीर्तन, प्रवचन, भजन आणि भारूड या कलाप्रकारांशी ते आपोआप जोडले गेले. गावच्या जत्रेत किंवा पालखी, दिंडी सोहळ्यात रामचंद्र देखणे वेगवेगळी सोंगे आणून भारुडे करू लागले. डॉ. देखणे हे उत्तम वक्ते होते. त्यांनी महाराष्ट्रभर व महाराष्ट्राबाहेर विविध विषयांवर अनेक व्याख्याने दिली. देशविदेशांत त्यांनी भारुडाचे कार्यक्रम केले.
देखणे यांनी संत साहित्यावरही विपुल लेखन केले. ‘अंगणातील विद्यापीठ’, ‘आनंद तरंग’, ‘आनंदाचे डोही’, ‘आषाढी’, ‘भारुड आणि लोकशिक्षण’, ‘दिंडी’, ‘तुका झालासे कळस’, ‘तुका म्हणे जागा हिता’,’ महाकवी’ अशी डॉ. देखणे यांची ३८ ललित, संशोधनपर आणि चिंतनात्मक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.