पायोनिअर अर्बन बँकेचा केंद्रीय सहकार खात्याकडून गौरव : यंदा रौप्यमहोत्सव साजरा करणार
प्रतिनिधी / बेळगाव
अनसूरकर गल्ली येथील दि बेळगाव मर्चंट्स को-ऑप. क्रेडिट सोसायटीतर्फे पायोनिअर अर्बन बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर यांचा सत्कार सोसायटीच्या कार्यालयात करण्यात आला. अध्यक्षस्थानी चेअरमन नारायण चौगुले होते. प्रमुख पाहुणे म्हणून मराठा बँकेचे संचालक व माजी चेअरमन बाळासाहेब काकतकर आणि समर्थ अर्बन को-ऑप. सोसायटीचे चेअरमन अजय सुनाळकर उपस्थित होते. व्यासपीठावर उपाध्यक्षा कुमुद भाटीया होत्या.
प्रारंभी शाखेचे चेअरमन नारायण किटवाडकर यांनी प्रास्ताविक करून प्रदीप अष्टेकर, बाळासाहेब काकतकर आणि ऍड. अजय सुनाळकर यांचा परिचय करून दिला. नारायण चौगुले यांनी सोसायटीच्या कारभाराचा आढावा घेऊन सोसायटी 2023 मध्ये रौप्यमहोत्सव भव्य स्वरुपात साजरा करणार आहे, अशी माहिती दिली. प्रदीप अष्टेकर यांचा पायोनिअर अर्बन बँकेमध्ये 106 कोटी रुपयांच्या ठेवी जमविल्याबद्दल तसेच बँकेला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दिल्ली येथे केंद्रीय सहकार खात्याने त्यांचा खास गौरव केला. बेळगाव सहकार क्षेत्रात प्रथमच अशी गोष्ट घडली आहे. हा बेळगाव शहरातील सहकार क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्यासारखा आहे.
यावेळी मर्चंट्स सोसायटीच्यावतीने प्रदीप अष्टेकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी अष्टेकरांचे अभिनंदन केले. त्यानंतर बाळासाहेब काकतकर आणि
ऍड. अजय सुनाळकर यांचाही शाल, पुष्पहार आणि फळांचे ताट देऊन सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना प्रदीप अष्टेकर म्हणाले, सहकारी बँकांवर आरबीआयने अनेक जाचक अटी लादल्या आहेत. त्यामुळे बँका चालविणे तारेवरची कसरत आहे. बँकेचे संचालक आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे आम्ही हे यश मिळविले आहे. ठेवीदारांनी विश्वास ठेवल्याने आम्ही ही गरुडझेप घेतली आहे.
बाळासाहेब काकतकर आणि
ऍड. अजय सुनाळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. रवी नाईक यांनी प्रदीप अष्टेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. ज्येष्ठ संचालक
ऍड. अशोक बोळगुंडी यांनी आभार मानले. यावेळी सोसायटीचे ज्येष्ठ संचालक अशोक यळ्ळूरकर, महेश रायकर, शिवाजी चव्हाण, नितीन पवार, सोसायटीचे जनरल मॅनेजर लक्ष्मीकांत मकवान, शाखा मॅनेजर संतोष फडतरे, सल्लागार संचालक संजय ओझा, संचालक ऍड. सुरेश जरळे, ऍड. प्रभाकर शेट्टी, ऍड. उमेश यरडाल, एन. एम. रायकर, ऑडिटर नितीन हिरेमठ तसेच सोसायटीचा कर्मचारी वर्ग आणि पिग्मी एजंट उपस्थित होते.