

उदय सावंत/वाळपई
सर्प हा जैवविविधतेचा महत्त्वाचा घटक आहे. हल्लीच्या काळामध्ये जंगल सोडून सर्प लोकवस्तीमध्ये घुसू लागलेले आहेत. या मागे अनेक कारणे आहेत. मात्र या सार्पना जीवदान देण्याचे महान कार्य सर्पमित्रांकडून होत आहे. सत्तरी तालुक्मयातील प्रदीप गंवडळकर व विनोद सावंत यांनी आतापर्यंत हजारों सर्पांना जीवदान देण्याचे महत्त्वाचे कार्य केलेले आहे.
सत्तरी तालुका हा पूर्णपणे ग्रामीण स्वरूपाचा आहे?. सभोवताली असलेल्या जंगलामुळे मोठय़ा प्रमाणात सर्प आढळत असतात?. हल्लीच्या काळामध्ये सर्प लोकवस्तीमध्ये घुसू लागलेले आहेत?. घरातील स्वयंपाक खोलीपर्यंत सर्प पोहोचू लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यामुळे सातत्याने सर्प आढळून येण्याचे प्रकार सत्तरी तालुक्मयामध्ये वारंवारपणे घडत आहे.
काही ठिकाणी सर्पाला मारण्यात येते. मात्र सर्पमित्रांचा उदय झाल्यापासून त्यांना जीवदान देण्याची प्रक्रिया गतिमान होऊ लागलेली आहे. वन खात्याच्या माध्यमातून सर्पाना जीवदान देणे व जैवविविधतेला अभय मिळवून देणारे कार्य सर्पमित्र प्रदीप गवंडळकर व विनोद सावंत यांनी आतापर्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडलेले आहे. यामुळे सर्पमित्र हा जैवविविधतेचा महत्त्वाचा घटक असल्याचे आता स्पष्ट होऊ लागलेले आहे.
प्रदीप गवंडळकर यांनी दिले हजारो सार्पांना जीवदान
सर्पमित्र प्रदीप गवंडळकर यांचे नाव आता सध्यातरी सत्तरी तालुक्मयात प्रचलित झालेले आहे. गोव्याच्या वेगवेगळय़ा भागातूनही त्यांना सर्प पकडण्यासाठी निमंत्रण येताना दिसत आहेत. त्यांनी जवळपास 5000 पेक्षा जास्त सार्पांना जीवदान दिलेले आहे. यामध्ये 50 पेक्षा जास्त किंग कोब्राना जीवदान दिलेले आहे. या संबंधी बोलताना त्यांनी सांगितले की, अनेक वेळा कठीण परिस्थितीमध्ये सर्पांना जीवदान देण्यास आपण सक्षम ठरलेलो आहे. अमृतसिंग यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण घेतल्यानंतर सर्पांना पकडण्याचे तंत्र आपल्यात निर्माण झाले. पूर्वी काही प्रमाणे ही अवघड गोष्ट वाटत होती. मात्र निसर्गाचा होणारा ऱहास यामुळे येणाऱया काळात आपल्यासमोर संभाव्य दुष्परिणाम याचा सारासार विचार करून आपल्याला या कार्यामध्ये आनंद वाटू लागला. आज आपण हजारो सर्पांना जीवदान दिल्याचे समाधान वाटत आहे.
फक्त सर्पाना जीवदान देण्यात त्यांचे कार्य थांबत नाही तर आतापर्यंत शेकडो विद्यालयांमध्ये सर्पासंदर्भात समज-गैरसम यावर विशेष कार्यक्रम घेतलेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे सर्प कशाप्रकारे पकडण्यात येतो व त्याची शारीरिक रचना कशी असते यासंबंधी माहिती अनेकवेळा कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली आहे. सर्पमित्राबरोबरच ते चांगल्या प्रकारचे निसर्गप्रेमी आहेत. जंगलाची ओळख मुलांना व्हावी व त्यांच्या मते निसर्गाबाबत आत्मियता निर्माण व्हावी या दृष्टिकोनातूनही त्यांनी आतापर्यंत चांगल्या प्रकारचे कार्य केले आहे.
विनोद सावंत यांचे सात वर्षापासून कार्य
गेल्या सात वर्षांपासून पाली सत्तरी येथील विनोद सावंत सर्पमित्राचे चांगल्या प्रकारे कार्य करीत आहे. वन खात्याच्या माध्यमातून ते कार्यरत असून त्यांनी आतापर्यंत सर्प पकडण्याचे प्रशिक्षण अमृतसिंग यांच्याकडून घेतलेले आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत त्यांनी 64 किंग कोब्रा व 9 हजार पेक्षा जास्त इतर सर्पांना जीवदान दिलेले आहे. यामुळे त्यांचे कार्य प्रत्येकासाठी प्रभावित करणारे आहे. सर्पमित्र म्हणून कार्यरत असताना ते दिवसभर जनतेसाठी उपलब्ध असतात अनेक वेळा रात्रीच्या वेळी आपल्याला सर्प असल्याचे निमंत्रण येतात. यामुळे वेळेचे व काळाचे भान न ठेवता घरामध्ये व अन्य ठिकाणी असलेले सर्प पकडून त्यांना जीवदान देण्याचे कार्य आतापर्यंत आपण प्रामाणिकपणे केलेले आहे असे यावेळी त्यांनी सांगितले. आपण वनाखात्यामध्ये टेकर म्हणून कामाला आहे. आपल्या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा होणार नाही याची विशेष दखल आपण घेत असतो. वनखात्याच्या अधिकाऱयाकडून सातत्याने आपल्याला प्रोत्साहन प्राप्त होत असते. पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्याचे कार्य याच माध्यमातून होत आहे व सर्पमित्र म्हणून कार्यरत असताना सर्पांना जीवदान देण्याचे कार्य सुद्धा पर्यावरणाशी निगडित असल्यामुळे या कामांमध्ये आपल्याला विशेष आनंद असल्याचे विनोद सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.