Tarun Bharat

प्रज्ञानंदची अनिश गिरीवर मात

Advertisements

दुसऱया फेरीतही विजयी घोडदौड कायम, कार्लसनसह संयुक्त बरोबरीत

मियामी / वृत्तसंस्था

युवा भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने एफटीएक्स क्रिप्टो चषक स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम राखताना दुसऱया फेरीत नेदरलँड्सच्या अनिश गिरीला 2.5-1.5 फरकाने पराभूत केले. ही स्पर्धा अमेरिकन फिनाले चॅम्पियन्स चेस टूरचा एक भाग आहे.

17 वर्षीय आर. प्रज्ञानंदने पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीतील चौथ्या मानांकित अलिरेझा फिरोझाला पराभवाचा धक्का देत जोरदार सुरुवात केली. प्रज्ञानंदने अलीकडेच चेस ऑलिम्पियाडमध्ये भारत ब संघाला कांस्य जिंकून देण्यातही मोलाचा वाटा उचलला होता. पहिल्या तीन फेऱया अनिर्णीत राहिल्यानंतर येथे चौथ्या फेरीत त्याने 81 चालीत विजय मिळवला.

भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने 2 विजयांसह एकूण 6 गुण मिळवले असून तो नॉर्वेचा अव्वलमानांकित मॅग्नस कार्लसनसह संयुक्त बरोबरीत आहे. कार्लसनने दुसऱया फेरीत हॅन्स निएमनचा 3-1 असा पराभव केला. आता बुधवारी रात्री उशिराने होणाऱया लढतीत प्रज्ञानंदचा मुकाबला कार्लसनशी होणार होता. प्रज्ञानंदने कार्लसनला दोनवेळा ऑनलाईन लढतीत पराभूत केले असून मागील काही महिन्यात तो उत्तम बहरात देखील राहिला आहे. येथील प्रत्येक सामन्यात 4 रॅपिड लढती होत असून 2-2 बरोबरी झाल्यास ब्लित्झ टायब्रेकचा अवलंब केला जातो.

error: Content is protected !!