वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप : सायना नेहवाल उपउपांत्यपूर्व फेरीत पराभूत
वृत्तसंस्था /टोकियो
भारताच्या एचएस प्रणॉयने एका गेमची पिछाडी भरून काढत येथे सुरू असलेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये आपल्याच देशाच्या लक्ष्य सेनचे आव्हान संपुष्टात आणत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. पुरुष दुहेरीत एमआर अर्जुन-धुव कपिला आणि सात्विक साईराज-चिराग शेट्टी यांनीही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. महिला एकेरीत सायना नेहवालचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीतच समाप्त झाले.
सव्वातास रंगलेल्या लढतीत प्रणॉयने राष्ट्रकुल सुवर्णविजेत्या लक्ष्य सेनवर 17-21, 21-16, 21-17 अशी मात केली. या वर्षात दोघांमध्ये झालेली ही चौथी लढत होती. दोघांनी यापैकी प्रत्येकी दोन लढती जिंकल्या आहेत. प्रणॉयची पुढील लढत चीनच्या झाओ जुनपेंगशी होणार आहे.
दोन जोडय़ांची आगेकूच
पुरुष दुहेरीमध्ये भारताच्या दोन जोडय़ांनी आपली विजयी घोडदौड कायम राखत शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविले. बिगरमानांकित धुव कपिला व एमआर अर्जुन यांनी 58 मिनिटांच्या संघर्षानंतर सिंगापूरच्या टेरी ही व लोह कीन हीन यांचा 18-21, 21-15, 21-16 असा पराभव केला. याआधी त्यांनी आठव्या मानांकित व मागील वेळच्या कांस्यविजेत्या डेन्मार्कच्या किम ऍस्ट्रप व स्कारुप रासमुसेन यांना पराभवाचा धक्का दिला होता.
पुरुष दुहेरीच्या अन्य एका सामन्यात सात्विक साईराज व चिराग शेट्टी यांनी डेन्मार्कच्या जेपा बे व लासे मोलहेदे यांचा केवळ 35 मिनिटांत 21-12, 21-10 असा पराभव केला. अर्जुन-कपिला यांची पुढील लढत इंडोनेशियाच्या तिसऱया मानांकित मोहम्मद एहसान-हेंद्रा सेतियावान यांच्याशी तर सात्विक-चिराग यांची लढत जपानच्या दुसऱया मानांकित ताकुरो होकी व युगो कोबायाशी यांच्याशी होणार आहे.
सायनाचा संघर्षानंतर पराभव
महिला एकेरीत ऑलिम्पिक कांस्यविजेत्या सायना नेहवालला झुंजार लढतीनंतरही थायलंडच्या बुसानन आँगबामरुंगफनकडून 17-21, 21-16, 13-21 असा पराभव स्वीकारावा लागला. 32 वर्षीय सायनाला बुसाननने प्रारंभापासूनच दडपणाखाली ठेवत पहिल्या गेममध्ये ब्रेकपर्यंत 11-3 अशी आघाडी घेतली. सायनाने ही आघाडी नंतर 17-19 अशी कमी केली तरी बुसाननने मनाचा समतोल राखत हा गेम जिंकून आघाडी घेतली. पहिल्या गेममधील अखेरच्या टप्प्यातील खेळानंतर सायनाला आत्मविश्वास मिळाल्यामुळे दुसऱया गेममध्ये तिने आक्रमक खेळ करीत विजय मिळवून बरोबरी साधली. निर्णायक गेममध्ये ब्रेकपर्यंत दोघींचा तोडीस तोड खेळ झाला. पण बुसाननने हळूहळू नियंत्रण मिळवित पाच गुणांची आघाडी घेतली आणि सायनाचा खेळ ढिला पडत गेला. बुसाननने सातव्या मॅचपॉईंटवर गेमसह सामना जिंकून आगेकूच केली. या दोघींत आतापर्यंत 8 लढती झाल्या असून गेल्या पाच लढतीत बुसानने सायनावर विजय मिळविला आहे.
ली झी जियाचा स्वप्नभंग, यामागुची, मारिन, ऍक्सेलसेन यांची आगेकूच
मलेशियाचा पहिला वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचे पाचव्या मानांकित ली झी जियाचे स्वप्न तिसऱया फेरीतच धुळीस मिळाले. चीनच्या बिगरमानांकित झाओ जुनपेंगने त्याचे आव्हान 21-19, 11-21, 21-19 असे संपुष्टात आणत उपांत्यपूर्व फेरी गाठली. अव्वल पाचपैकी तीन मानांकित खेळाडू उपांत्यपूर्व फेरीआधीच या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. डेन्मार्कच्या अग्रमानांकित व्हिक्टर ऍक्सेलसेनने शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविताना थायलंडच्या सिथिकोम थम्मासिनचा 21-19, 21-16 असा पराभव केला. इंडोनेशियाच्या अँथोनी सिनिसुका जिनटिंगने चीनच्या शी युकीचा 21-11, 13-21, 21-18 असा पराभव करून युकीच्या पुनरागमनातील वाटचालीला ब्रेक लावला. याशिवाय विद्यमान चॅम्पियन लोह कीन यू, महिलामधील विद्यमान चॅम्पियन अकाने यामागुची, स्पेनची कॅरोलिना मारिन यांनीही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. यामागुचीने आपल्याच देशाच्या ताकाहाशीचा तर मारिनने चीनच्या हे बिंगजिआवचा पराभव केला.