हलगा-मच्छे बायपास शेतकऱयांना दिलासा ः
प्रतिनिधी/ बेळगाव
हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम सुरू होते. मात्र, आता प्रांताधिकाऱयांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रोजेक्ट डायरेक्टर यांना काम थांबविण्याबाबत पत्र पाठविले आहे. या पत्राची प्रत याचिकाकर्ते मोनाप्पा बाळेकुंद्री यांनाही दिली आहे. त्यानंतर शनिवारी तेथील रस्ता करणारी सर्व वाहने अचानकपणे हलविण्यात आली. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि अधिकारीही अडचणीत आल्याचे दिसून येत आहे.
हलगा-मच्छे बायपासला कायमस्वरुपी स्थगिती होती. याबाबत शेतकऱयांनी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिले होते. 26 एप्रिल 2022 रोजी आठवे अतिरिक्त दिवाणी न्यायालयामध्ये असलेल्या प्रलंबित खटल्याबाबत सर्व अधिकाऱयांना निवेदने देण्यात आली होती. तरीदेखील हे काम सुरूच ठेवण्यात आले होते. यामुळे उच्च न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. तरीदेखील काम सुरूच होते.
26 एप्रिलपासून संबंधित स्थगितीबाबतची कागदपत्रे अधिकाऱयांना दिली असतानाही 18 मेपर्यंत या रस्त्याचे काम सुरूच ठेवण्यात आले आहे. असे असताना शनिवारी मात्र अचानकपणे काम बंद करण्यात आले आहे. सोमवारी न्यायालये सुरू होणार आहेत. त्यामुळे आपण अडचणीत सापडू, अशी त्यांना भीती आहे. त्यातूनच अशा प्रकारे प्रांताधिकाऱयांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रोजेक्ट डायरेक्टरना हे पत्र पाठविल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
न्यायालयामध्ये पुन्हा युक्तिवाद करण्याचा हा डाव आहे. मात्र, आता पत्र पाठविल्यामुळे काम सुरू होते हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे शेतकऱयांचे वकील रवीकुमार गोकाककर यांनी स्पष्ट केले. एकूणच शनिवारी अचानकपणे या रस्त्यावरील सर्व वाहने हलविण्यात आल्यामुळे काहिसा दिलासा मिळाला आहे. यापुढे तरी न्यायालयाचे म्हणणे मांडणार की पुन्हा न्यायालयाचा अवमान करणार हे पाहावे लागणार आहे.