Prasad Laad : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या विवादित वक्तव्यानंतर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकिय वातावरण पुन्हा तापले आहे. शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असून त्यांचे बालपण शिवनेरी किल्ल्यावर गेले असे वक्तव्य आमदार लाड यांनी एक कार्यक्रमा दरम्यान दिले होते. यानंतर विविध राजकिय नेत्याकडून या वक्तव्याचा निषेध केला.
त्यानंतर आपल्या वक्तव्यानंतर आम. प्रसाद लाड (Prasad Laad) यांनी राष्ट्रवादीवर (NCP) राजकारण करत असल्याचा आरोप ठेऊन दिलगीरी व्यक्त केली आहे. आपल्या एका व्हिडीओमध्ये ते म्हणाले, “छत्रपती शिवरायांच्या नावाने राष्ट्रवादी जे राजकारण करत आहे, त्याचा मी निषेध व्यक्त करतो. काल ज्या भावनेतून मी वक्तव्य केलं, तिथे मी चूकही सुधारली होती. छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी व स्वराज्याची स्थापना ही कोकणातून झाली असे मी स्पष्ट केलं होतं. छत्रपतींचा जन्म शिवनेरीवर झाला, हे सुद्धा त्यावेळीच सांगितलं. माध्यमात ते आलेले आहे. तरीही छत्रपतींचे नाव घेऊन राजकारण करण्याचं काम राष्ट्रवादी सातत्याने करत आहे. राष्ट्रवादीचा मी निषेध व्यक्त करतो. माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो,”
दरम्यान, या विधानानंतर अनेक राजकिय व्यक्तींनी आपला निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजपाने आता प्रायश्चित्त करण्याची गरज आहे, अशा शब्दांत टीका केली आहे. तर खासदार अमोल कोल्हे यांनी “काय ते अगाध ज्ञान! तुम्हाला चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून किंवा कोणत्याही शिवभक्ताकडून विशेष प्रशिक्षण देण्यात घेण्याची गरज आहे”. असा टोला लगावला आहे. तर प्रसाद लाड मुर्ख माणूस असून अशा महत्वाच्या पदावरिल लोक छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल अशी विधाने कशी काय करू शकतात? जोपर्यंत अशा नेत्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असा इशारा स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला होता.


previous post