विधानसभा निवडणुकांना सामोऱया जाणाऱया राज्यांमधील नेत्यांना इशारा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
निवडणूक सल्लागार प्रशांत किशोर यांचा काँगेस प्रवेश निश्चित झाला आहे. येत्या काही दिवसांमध्ये ते काँगेसवासी होण्याची शक्यता आहे. त्यांच्या आगमनापूर्वी काँगेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आगामी काळात विधानसभा निवडणुकांना सामोऱया जाणाऱया राज्यांमधील काँगेसच्या नेत्यांना इशारा दिला असून त्या या राज्यांमध्ये पक्षाची पुनर्बांधणी करण्याच्या तयारीत आहेत.
हरियाणा, मध्यप्रदेश आणि राजस्थान येथे काँगेसमध्ये अंतर्गत कलह उफाळून आले आहेत. त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची त्यांची योजना आहे. विशेषतः राजस्थानात सचिन पायलट मुख्यमंत्रीपदावर दावा सांगत आहेत. त्यामुळे या राज्यासंबंधी आगामी चिंतन शिबिरानंतर ठोस निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना राजीनामा देण्यास सांगणे हे सोपे कार्य नसून ते पक्षश्रेष्ठींसमोरचे सर्वात मोठे आव्हान असल्याचे तज्ञांचे मत आहे.
लोकसभा निवडणूक हे लक्ष्य
2024 मध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आदी राज्यांमध्ये काँगेसला यश मिळवून देणे ही प्रशांत किशोर यांची जबाबदारी असेल असे बोलले जाते. या राज्यांमध्ये भाजप आणि काँगेस यांच्यात थेट लढत होत असते. किशोर यांनी काँगेसला दिलेल्या 600 पानांच्या सादरीकरणात या राज्यांवर विशेष भर देण्यात आल्याचे समजते.
बिगर गांधी कुटुंब नेता
काँगेसच्या महासचिवांमध्ये गांधी कुटुंब वगळता अन्य प्रभावी नेत्याचा समावेश होणे आवश्यक आहे, असे किशोर यांचे प्रतिपादन आहे. त्यासंबंधी अद्याप कोणतेही उघड वक्तव्य करण्यात आलेले नाही. तथापि, पक्षश्रेष्ठींचा तसा विचार असल्याचे बोलले जात आहे. अशोक गेहलोत यांचा यापदासाठी विचार होऊ शकतो, अशी चर्चा आहे. मात्र, यासंबंधी पक्षात दुमत असल्याचेही संकेत आहेत.
नव्या चेहऱयांना प्राधान्य
किशोर यांच्या योजनेनुसार सर्व राज्यांमध्ये नव्या चेहऱयांना प्राधान्य दिल्यास काँगेसला लाभ होऊ शकतो. तथापि, नुकत्याच झालेल्या पंजाब मधील विधासभा निवडणुकीत अचानक नव्या चेहऱयाची मुख्यमंत्रीपदी झालेली नियुक्ती काँगेसला महागात पडली होती. त्यामुळे किशोर यांचा सल्ला सावधपणेच घ्यावा, असे स्पष्ट मत काही पदाधिकाऱयांनी व्यक्त केल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.
किशोर प्रवेशासंबंधी मतभेद ?
प्रशांत किशोर यांना काँगेसमध्ये प्रवेश देऊन निवडणूक धोरण ठरविण्याचे अधिकार त्यांना देण्यासंबंधी काँगेसमध्येच मतभेद असल्याचेही बोलले जाते. पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचा किशोर यांच्या वर्चस्वाला विरोध आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. पक्षश्रेष्ठींनी त्यासंबंधी अद्याप उघड बोलणे टाळले आहे. मात्र, आतील खदखद मिटविण्याचाही प्रयत्न सुरु असल्याचे समजते.