नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँगेस पक्षाला माझी नव्हे, तर बळकट नेतृत्वाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन करत निवडणूक धोरण सल्लागार प्रशांत किशोर यांनी काँगेस प्रवेशाचा प्रस्ताव नाकारला आहे. त्यांनी पक्षात यावे असा प्रस्ताव काँगेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिला होता. गेले दोन आठवडे त्यावर राजकीय वर्तुळात बरीच चर्चाही झडली होती. तथापि, किशोर यांनीच चर्चेवर पडदा टाकला.
ही माहिती काँगेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मंगळवारी दिली. प्रशांत किशोर यांनी काँगेसला अनेक उपयुक्त सूचना केल्या आहेत. आम्ही त्या सूचनांवर विचार करत आहोत. सूचनांसाठी आम्ही किशोर यांचे आभारी आहोत. काँगेस कार्याध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांना पक्षप्रवेशासाठी प्रस्ताव दिला होता. त्यांच्यावर विशिष्ट उत्तरदायित्व निर्धारित करण्याचीही त्यांची तयारी होती. तथापि, किशोर यांनी प्रस्ताव नाकारल्याचे रणदीप सुरजेवाला यांनी स्पष्ट केले.
मार्गसूची सादरीकरण
16 एप्रिलला किशोर यांनी काँगेसला 600 पानांची एक सविस्तर मार्गसूची सादर केली होती. तेव्हापासून त्यांच्या काँगेस प्रवेशाच्या चर्चा रंगू लागल्या. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपशी दोन हात करण्यासाठी अनेक उपाय योजना त्यांनी या सादरीकरणात सुचविल्या होत्या, असे बोलले जाते.