ऑनलाईन टीम / मुंबई :
आयएनएस विक्रांत (ins vikrant) सेव्ह मोहिम भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (neel somaiya) यांनी राबवली. पण त्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. याप्रकरणात सोमय्या पिता-पुत्रावर गुन्हा दाखल असून, दोघांचाही जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. सोमय्या हे धाडसी नेते आहेत. सत्ताधाऱ्यांचे अनेक घोटाळे त्यांनी समोर आणले आहेत. सरकार विरुद्ध बोलल्याने त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. पण सोमय्या हे पळून जाणारे नेते नाहीत. ते इतरांना पळवून लावणारे नेते आहेत, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
दरेकर म्हणाले, सोमय्यांनी अनेकांचे घोटाळे बाहेर काढले आहेत. ज्यावेळी आरोप होतात, टीका होते तेव्हा घाबरायचं कारण नाही. ते धाडसी आहेत त्यामुळे ते कुठेही पळुन जाणार नाहीत. सोमय्यांवरील कारवाईचे काम हे पोलिसांच्या दबावाखाली सुरू आहे. महाविकास आघाडीकडून माझ्यावरही कारवाईचा ससेमिरा लावला, परंतु हा दबाव न्यायालयाने फेटाळून लावला. संजय राऊत यांचा एक अजेंडा आहे. भाजपचा एखादा नेता तुरुंगात जात नाही तोपर्यंत राऊतांना झोप लागणार नाही. केवळ दहशत माजवण्याचा उद्देशाने सरकारने आणि पोलिसांनी सोमय्यांना त्रास दिला आहे.
कायदेशीर कारवाईच्या कामात असल्याने ते चौकशीला सोमोरे जात नसतील. आवश्यकता वाटल्यास ते स्वतःहून पोलिसांच्या सामोर येतील, असेही दरेकर म्हणाले.