तरुण भारत

गुरुवंदनासाठी मराठा समाजाची जय्यत तयारी

आदर्श विद्यामंदिरच्या मैदानावर उद्या कार्यक्रमाचे आयोजन : मराठा समाज हजारोंच्या संख्येने एकवटणार

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

बेळगाव सकल मराठा समाजाच्यावतीने रविवार दि. 15 मे रोजी वडगाव येथील आदर्श विद्यामंदिरच्या मैदानावर गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी केली जात आहे. शुक्रवारी मैदानावर भव्य शामियाना उभारण्याचे काम सुरू असून याचबरोबर इतर मंडपही उभारणी करणे सुरू आहे. बेळगाव परिसरातील मराठा समाज हजारोंच्या संख्येने एकवटणार असल्याने आयोजकांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे.

विखुरलेल्या मराठा समाजाला एका छताखाली आणण्यासाठी सकल मराठा समाजाच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम घेतला जात आहे. मराठा समाजाचे जगद्गुरु वेदांताचार्य मंजुनाथ भारती स्वामींचा सत्कार व समाजाचे प्रबोधन असा संयुक्त कार्यक्रम होणार आहे. सकाळी 9 वा. कपिलेश्वर मंदिराकडून भव्य अशी मिरवणूक काढली जाणार आहे. ही मिरवणूक खडेबाजार शहापूर, नाथ पै चौक, वडगाव  मार्गे आदर्श कॉलेजच्या मैदानावर पोहोचणार आहे. यासाठी बेळगावसह आसपासच्या परिसरातील मराठा समाज सक्रिय झाला आहे.

हजारोंच्या संख्येने मराठा समाज एकवटला असल्याने तशी तयारीही केली जात आहे. आदर्श विद्यामंदिरच्या पटांगणावर भव्य असा मंडप उभा करण्यात येत आहे. याचबरोबर हिंदवाडी येथील मुख्य रस्त्यांवर मोठे मंडप उभे करण्यात आले आहेत. कार्यक्रमासाठी दाखल होणाऱया मराठा समाजाच्या सदस्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

मान्यवरांची राहणार उपस्थिती

मराठा समाजाचे जगद्गुरु मंजुनाथ भारती स्वामीजी यांच्यासोबत काशी येथील वेदांताचार्य स्वामी चैतन्यपुरी, नूल ता. गडहिंग्लज येथील रामनाथगिरी समाधी मठाचे मठाधिपती प. पू. भगवानगिरी महाराज यांची उपस्थिती असणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात मराठा आरक्षणावर रान पेटविलेले कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे हेही उपस्थित राहणार आहेत. या मान्यवरांच्या सानिध्यात मराठा समाजाचा हा भव्य कार्यक्रम होणार आहे.

गावागावात जागृती

सकल मराठा समाजाच्या सदस्यांकडून मागील महिनाभरापासून प्रत्येक गावात, शहरातील प्रत्येक गल्लीत जाऊन मराठा समाजाची एकी का गरजेची आहे? याविषयी जागृती केली जात आहे. या पुढील काळात मराठा समाज उपेक्षित राहू नये, यासाठी आतापासूनच सक्रिय राहण्याचे आवाहन केले जात आहे. रविवारी होणाऱया मंजुनाथ भारती स्वामीजींच्या सत्काराला लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन गावोगावी केले जात आहे.

पोलिसांकडून कार्यक्रमस्थळाची पाहणी

रविवारी होणाऱया गुरुवंदना कार्यक्रमासंदर्भात पोलीस प्रशासनाने शुक्रवारी संपूर्ण कार्यक्रमाची माहिती जाणून घेतली. छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापासून काढण्यात येणाऱया शोभायात्रेच्या मिरवणूक मार्गाची पाहणी केली. तसेच आदर्श विद्यामंदिर पटांगणावर उपस्थित राहून आढावा घेतला. कार्यक्रमास उपस्थितांची संख्या किती असेल, पार्किंगची व्यवस्था याबाबत डीसीपी रविंद्र गडादी, एसीपी कट्टीमणी, पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर यांच्यासह अन्य अधिकाऱयांसमवेत सविस्तर चर्चा केली. यावेळी मराठा समाजाचे किरण जाधव यांनी संपूर्ण कार्यक्रमाची माहिती दिली आणि प्रशासनाने संपूर्ण सहकार्य करावे, अशी विनंती केली. पोलीस अधिकाऱयांशी चर्चा करतेवेळी अनंत लाड, रमेश रायजादे यांच्यासह समजातील प्रमुख हजर होते.

मराठा समाज एकत्रित यावा

सकल मराठा समाजाच्यावतीने रविवार दि. 15 रोजी गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला मंजुनाथ भारती स्वामीजींसह कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे उपस्थित राहणार आहेत. मराठा समाज एकत्रित यावा या उद्देशाने हा कार्यक्रम केला जात असून, शोभायात्रा व सत्कार कार्यक्रमाला मराठा समाजाने उपस्थित रहावे, असे आवाहन सकल मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव यांनी केले.

– किरण जाधव (संयोजक सकल मराठा समाज)

Related Stories

कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी रोबोटची निर्मिती

Patil_p

अमृत पोतदार-एसडीएम, सीसीके-बीएससी उपांत्य लढती आज

Amit Kulkarni

बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातच वाहतूक कोंडी

Patil_p

मतिमंद मुलाला सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आधार

Amit Kulkarni

फिट इंडियासाठी धावले जवान

Patil_p

अलायन्स एअरची पुणे विमानसेवा तात्पुरती बंद

Amit Kulkarni
error: Content is protected !!