प्रतिनिधी /पणजी
नवीन वर्ष 2023 चे आगमन होण्यास फक्त 10 दिवसाचा कालावधी बाकी असून गोव्यात सर्वत्र त्याच्या स्वागताची तयारी सुरू आहे. प्रमुख हॉटेल्सनी नववर्षाच्या स्वागताचे विविध रंगी कार्यक्रम आखले असून त्यांचे ऑनलाईन आरक्षण सुरू केले आहे. त्यास मोठा प्रतिसाद मिळत असून चालू डिसेंबर 2022 च्या शेवटी गोव्यात पर्यटकांचा पूर येण्याची चिन्हे दिसत आहेत.
गेली दोन वर्षे म्हणजे 2020 व 2021 कोरोनाच्या संकटामुळे नववर्ष स्वागतासाठी उत्साह नव्हता तसेच कार्यक्रमही नसल्याने पर्यटकांचा प्रतिसाद फारसा नव्हता. त्यामुळे गोव्यात 2021 व 2022 या दोन्ही वर्षाचे स्वागत तसे धुमधडाक्यात झाले नव्हते. यंदा मात्र कोरोनाचे संकट नसल्याने आणि ते पूर्णपणे निवळल्याने पर्यटक नवीन वर्षासाठी गोव्यात गर्दी करणार असल्याचे चित्र दिसत आहे. चालू डिसेंबरच्या शेवटच्या दिवसात गोव्यातील बहुतेक हॉटेल्स, गेस्ट हाऊस अगोदरच ‘फुल्ल’ झाली असून नववर्षाचे स्वागतही पर्यटकांच्या गर्दीने होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
‘विकेंड’च्या जोडीमुळे उत्साहात वाढ
यंदाच्या म्हणजेच 2022 च्या वर्ष समाप्तीला आणि नवीन वर्ष 2023 च्या प्रारंभाला शनिवार व रविवार अशा प्रकारची ‘विकेंड’ ची जोड मिळाल्याने गोव्यात येणाऱया पर्यटकांना ते सोयीस्कर ठरले आहे.
गोव्याकडे येणाऱया-जाणाऱया विमान, बस व इतर राज्य, वाहतुकीचे प्रवासी दर वाढवण्यात आले असून त्यांचे ही आरक्षण चांगले झाल्याची माहिती मिळाली आहे. हॉटेल्स रूमचे दर तसेच दुरिस्ट टॅक्सीचे प्रवासी दरही वाढले असून ते वार्षिक हंगामानुसार वाढल्याची माहिती देण्यात आली. चालू डिसेंबर महिन्यातील शेवटचे तीन दिवस म्हणजे गुरूवार ते शनिवार (29, 30, 31 डिसेंबर) ती वाढणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.