10 किलोमीटरचा रोड शो : रेल्वेस्थानक उद्घाटनासह किसान सन्मान निधीचे होणार वितरण
बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहर सज्ज झाले आहे. रोड शो व जाहीर सभेसाठी तयारी पूर्ण झाली असून रोड शोच्या मार्गावर बॅरिकेड्स उभे करण्यात आले आहेत. संपूर्ण शहरात व्यापक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रविवारी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी तयारीचा आढावा घेतला. सोमवार दि. 27 फेब्रुवारी रोजी दुपारी शिमोग्याहून पंतप्रधान विशेष विमानाने सांबरा विमानतळावर दाखल होणार आहेत. तेथून हेलिकॉप्टरने 2.15 वाजण्याच्या सुमारास एपीएमसीजवळील राज्य राखीव पोलीस दलाच्या परेड मैदानावरील हेलिपॅडवर पंतप्रधानांचे आगमन होणार आहे. त्यानंतर राणी कित्तूर चन्नम्मा चौक परिसरातून रोड शोला प्रारंभ होणार आहे. पंतप्रधानांच्या ताफ्यातील वाहने बेळगावात दाखल झाली आहेत. चन्नम्मा सर्कलपासून जाहीर सभेच्या ठिकाणापर्यंत तब्बल 8 ते 10 किलोमीटर हा रोड शो होणार आहे. दुपारी 3.15 वाजता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार असून सायंकाळी 4.30 पर्यंत जाहीर सभा होणार आहे. जाहीर सभेसाठी एक लाखाहून अधिक नागरिकांची उपस्थिती अपेक्षित असून पोलीस दलाने पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर व्यापक तयारी केली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी रविवारी दुपारी बेळगावला भेट देऊन तयारीची पाहणी केली. शिमोगा येथील विमानतळाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान बेळगावला येणार आहेत.
विविध विकासकामांचा शुभारंभ
आपल्या बेळगाव दौऱ्यात पंतप्रधान विविध विकासकामांना चालना देणार आहेत. बेळगाव रेल्वेस्थानकाचे उद्घाटन, लोंढा-बेळगाव-घटप्रभा दुपदरी रेल्वेमार्गाचे उद्घाटन, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 13 व्या टप्प्याचे अनुदान वितरण, महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेला चालना आदी विविध विकासकामांचा शुभारंभ केला जाणार आहे.
किसान सन्मान निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
यावेळी पत्रकारांशी बोलताना केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, देशातील 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 2 हजार रुपयेप्रमाणे 16 हजार कोटी रुपये साहाय्यधन थेट जमा होणार आहे. यामध्ये कर्नाटकातील 49 लाख 55 हजार शेतकऱ्यांचा समावेश असून त्यांच्या खात्यावर 991 कोटी रुपये जमा होणार आहेत. बेळगाव जिल्ह्यातील 5 लाख 10 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 102 कोटी रुपये जमा होणार आहेत. जलजीवन मिशन योजनेंतर्गत बेळगाव जिल्ह्यासंबंधीच्या 1 हजार 120 कोटी रुपये खर्चाच्या बहुग्राम पिण्याच्या पाणी योजनेचा कोनशिला समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. किसान सन्मान निधी योजनेतील रक्कम पंतप्रधान बटण दाबून ऑनलाईन पद्धतीने जमा करणार आहेत. लोंढा-बेळगाव-घटप्रभा दुपदरी रेल्वेमार्ग देशाला समर्पित करणार आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत राबविलेल्या कामांचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, केंद्रीयमंत्री शोभा करंदलाजे, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्यासह राज्य व जिल्ह्यातील अनेक नेते, आमदार, खासदार, विधान परिषद सदस्य उपस्थित राहणार आहेत. जाहीर सभेच्या ठिकाणी एक लाख आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे. रोड शोच्या मार्गावर आठ टप्प्यांची निश्चिती करण्यात आली आहे. या टप्प्यांवर नागरिकांना पंतप्रधानांचे स्वागत करता येणार आहे. एकूण 10.45 किलोमीटरचा हा रोड शो असल्याचेही प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. कार्यक्रमात भाग घेणारे लाभार्थी व नागरिकांसाठी जेवण, वाहनांचे पार्किंग आदींची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली.
असा असेल रोड शो
राणी कित्तूर चन्नम्मा चौकापासून पंतप्रधानांच्या रोड शोला सुरुवात होणार आहे. धर्मवीर संभाजी चौक, रामलिंग खिंड गल्ली, टिळक चौक, हुतात्मा हेमू कलानी चौक, शनिमंदिर, कपिलेश्वर उ•ाण पूल, डॉ. एस. पी. एम. रोड, छत्रपती शिवाजी उद्यान, जुना पी. बी. रोडमार्गे पंतप्रधान जाहीर सभेच्या ठिकाणी पोहोचणार आहेत.
तीन हजार पोलीस तैनात
पंतप्रधानांच्या बेळगाव दौऱ्याच्या बंदोबस्तासाठी 3 हजारहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, उपायुक्त शेखर एच. टी., गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून एसपीजी, गुप्तचर यंत्रणाही सतर्क आहेत. बंदोबस्तासाठी गरुडा फोर्स मागविण्यात आले आहे.