महिलेने नोंदविला विश्वविक्रम
जगात अनेक लोकांनी अजब विश्वविक्रम केले आहेत. दक्षिण आफ्रिकेतील एका महिलेने 1 तासात अनेक कप चहा तयार करत गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वतःचे नाव नोंदविले आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डनुसार दक्षिण आफ्रिकेतील इनगर वॅलेनटिन यांनी हा विक्रम केला आहे. हा विक्रम त्यांनी एक मोठय़ा कारणासाठी केला आहे.
2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या वुपर्थलमध्ये लोक नववर्षाच्या स्वागतात जमले असताना पर्वतीय भागातील जंगलात लागलेली आग नागरी वस्तीत फैलावल्याने मोठे नुकसान झाले होते आणि लोकांची घरेही जळून खाक झाली होती. सुमारे 200 लोक बेघर झाले होते. अशा लोकांमध्ये इनगरचाही समावेश होता. आगीने तिचे घर नष्ट होण्यासह पर्यटन विभागात असताना ती ज्या गेस्टहाउसचे संचालन करायची, ते देखील जळून खाक झाले होते. सुमारे 4 वर्षांनी तिने स्वतःला यातून सावरण्याचा प्रयत्न केला. शहराचे नाव पुन्हा एकदा पर्यटनस्थळ म्हणून लोकप्रिय करण्यासाठी मेहनत सुरू केली आहे. याच अंतर्गत तिने एक विश्वविक्रम नोंदविण्याचा विचार केला आहे.
इनगरने 1 तासात सर्वाधिक कप चहा तयार करून विश्वविक्रम स्वतःच्या नावावर केला आहे. याकरता तिने रुइबोस चहा तयार करण्याचा निर्णय घेतला होता, हा लाल हर्बल चहा असून तो ऍस्पलाथस लिनिअरीस नावाच्या रोपाच्या पानांपासून तयार होतो आणि दक्षिण आफ्रिकेतच मिळतो. विश्वविक्रम नोंदविण्यासाठी तिला 150 कप चहा तयार करण्याची गरज होती. परंतु तिने विक्रम मोडीत काढत 249 कप चहा तयार केला आहे. चहाचे कप कमी पडल्यावर उपस्थित लोकांनी तिला मदत करत हा विश्वविक्रम नोंदविण्यास हातभार लावला आहे.