मनपाला सादर केले अॅक्सेप्टन्स लेटर : निविदा प्रक्रियेच्या पूर्ततेनंतरच वर्क ऑर्डर
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील कचऱ्याची उचल करण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली होती. यामध्ये बीव्हीजी कंपनी पात्र ठरल्याने महापालिकेने निविदा मंजूर केली आहे. मात्र अॅक्सेप्टन्स लेटर दिले नसल्याने निविदेबाबत संभ्रम निर्माण होता. पण काम करण्याची तयारी असल्याचे पत्र बीव्हीजी कंपनीने शुक्रवारी मनपाला दिले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
शहरातील 48 वॉर्डांच्या स्वच्छतेचे काम कंत्राट पद्धतीने करण्यात येते. यापूर्वी 20 पॅकेजद्वारे स्वच्छतेचे काम करण्यात येत होते. मात्र यावेळी केवळ पाच पॅकेज तयार करून निविदा मागविल्या होत्या. पहिल्यांदा निविदा प्रक्रियेला प्रतिसाद लाभला नाही. पण दुसऱ्यांदा निविदा प्रक्रियेवेळी बीव्हीजी कंपनीने निविदा घातली होती. मात्र निविदा रकमेच्या 32 टक्के जादा दर देण्याची मागणी केली होती. नगरविकास खात्याने 4.5 टक्के वाढीव दर देण्याची तयारी दर्शवून निविदा मंजूर केल्या आहेत. सदर माहिती महापालिकेने बीव्हीजी कंपनीला देऊन अॅक्सेप्टन्स लेटर देण्याची सूचना केली होती. पण कंपनीकडून कोणताच प्रतिसाद नव्हता. त्यामुळे ही कंपनी काम करणार की नाही, याबाबत संभ्रम होता.
1 फेब्रुवारीपासून स्वच्छतेचे काम सुरू
महापालिकेने सदर कंपनीच्या प्रतिनिधींना संपर्क साधून याबाबत विचारणा केली होती. तसेच जर काम करणार नसल्यास तशी माहिती कळविण्याची सूचना केली होती. जर काम करणार नसल्यास निविदा प्रक्रिया रद्द करून नव्याने निविदा काढण्यात येतील, असा इशाराही दिला होता. त्यामुळे सदर कंपनीने काम करण्याची तयारी दर्शविली असून, महापालिकेला
अॅक्सेप्टन्स लेटर सादर केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पण अनामत रक्कम भरणे व निविदा प्रक्रियेची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्यानंतरच वर्क ऑर्डर दिली जाणार आहे. मात्र येत्या 1 फेब्रुवारीपासून सदर कंपनी स्वच्छतेचे काम सुरू करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.