आज घरगुतीसह सार्वजनिक गणेशमूर्तींचे होणार विसर्जन : शहराच्या मुख्य मार्गांवरुन मिरवणूक, ढोल-ताशांचा होणार गजर
बेळगाव : श़्रीगणेश विसर्जन मिरवणुकीची गणेश मंडळांनी जय्यत तयारी केली असून गुरूवार दि. 28 रोजी अनंत चतुर्दशीला बाप्पांना भक्तीभावाने निरोप दिला जाणार आहे. घरगुती गणपतींसह सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार असल्याने मनपा प्रशासनानेही विसर्जन तलावांची सज्जता केली असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलानेही चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. दुपारी 4 वाजता हुतात्मा चौक येथून सार्वजनिक गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात होईल. पहिल्या मानाच्या गणपतीचे पूजन झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरूवात होईल. मंगळवार दि. 19 रोजी मोठ्या थाटात गणरायांचे आगमन झाले. मागील 9 दिवसांमध्ये गणेश भक्तांनी गणरायाची मनोभावे पूजा केली. विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती. बेळगाव शहरात अनेक गणेश मंडळांनी भव्यदिव्य देखावे तसेच गणेशमूर्ती साकारल्या होत्या. देखावे पाहण्यासाठी मागील 4 ते 5 दिवसांपासून शहर व उपनगरांमध्ये प्रचंड गर्दी होत होती. वडगाव येथील रयत गल्ली परिसरात घरोघरी करण्यात आलेले देखावेही आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरत होते.
ढोल-ताशांचा होणार गजर
गुरूवार दि. 28 रोजी पारंपरिक पध्दतीने विसर्जन मिरवणूक काढली जाणार आहे. सकाळपासून घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाणार असून रात्री सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन होणार आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी ढोल-ताशांचा गजर गणेश भक्तांना ऐकता येणार आहे. बेळगावमध्ये भव्यदिव्य विसर्जन मिरवणूक काढली जाणार असल्याने गणेश भक्तांची संख्याही वाढणार असल्याने प्रशासनाने तशी खबरदारी घेतली आहे. पोलीस प्रशासनाने बंदोबस्तात वाढ केली असून मनपाने फिरती विसर्जन वाहने उपलब्ध करुन दिली आहेत. कपिलेश्वर येथील दोन्ही विसर्जन तलावांमध्ये अंदाजे 180 सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन होण्याची शक्यता आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील विसर्जन कपिलेश्वर तलावात होईल. टिळकवाडी, अनगोळ, गोवावेस या परिसरातील गणेशमूर्तींचे जक्कीनहोंड येथे विसर्जन होईल. याबरोबरच घरगुती मूर्तींचे विसर्जन मजगाव, अनगोळ, जुने बेळगाव, किल्ला तलाव, कणबर्गी तलाव याबरोबर इतर ठिकाणी होणार आहे.
पावसातही गणेशमूर्ती पाहण्यासाठी उत्साह
बुधवारी देखावे तसेच गणेशमूर्ती पाहण्यासाठीचा शेवटचा दिवस असल्याने सायंकाळपासूनच गणेश भक्तांची गर्दी झाली होती. परंतु सायंकाळी 7 नंतर सुरू झालेल्या पावसाच्या रिपरीपीमुळे गणेश भक्तांचा हिरमोड झाला. बऱ्याच जणांनी पावसात भिजत गणेशमूर्ती पाहण्यासाठी गर्दी केली होती. रात्री उशीरापर्यंत तरुणाईचा उत्साह दिसून आला. गर्दी असल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडीही झाली.