वैमानिक अभिनंदन होते या स्क्वाड्रनमध्ये कार्यरत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय वायुदल 30 सप्टेंबर रोजी मिग-21 स्क्वाड्रन निवृत्त करणार आहे. प्रसिद्ध वैमानिक विंग कमांडर (आता ग्रूप कॅप्टन) अभिनंदन वर्धमान याचाच हिस्सा होते अशी माहिती एका अधिकाऱयाने दिली आहे. श्रीनगर येथील नंबर 51 स्क्वाड्रनला ‘स्वॉर्ड आर्म्स’ या नावाने ओळखले जाते. भारतीय वायुदल मिग-21 लढाऊ विमानाच्या 4 स्क्वाड्रन्सपैकी एक स्क्वाड्रन सेवानिवृत्त करणार आहे.
फेब्रुवारी 2019 मध्ये अभिनंदन यांनी नियंत्रण रेषेवर एका पाकिस्तानी एफ-16 लढाऊ विमानाला पाडविले होते. या कामगिरीकरता अभिनंदन यांना वीरचक्राने सन्मानित करण्यात आले होते. या घटनेवेळी अभिनंदन हे ‘स्वॉर्ड आर्म्स’मध्ये कार्यरत होते.
1999 मध्ये कारगिल युद्धादरम्यान ही स्क्वाड्रन ‘ऑपरेशन सफेद सागर’मध्ये सामील होती. 2025 पर्यंत मिग-21 च्या सर्व स्क्वाड्रन्सना सेवानिवृत्त करण्याची योजना वायुदलाने आखली आहे. मिग-21 सोव्हियत काळातील सिंगल इंजिन मल्टीरोल लढाऊ विमान आहे. वायुदलाकडे सध्या 70 मिग-21 विमाने आहेत.