भगवान रामाच्या भूमिकेत प्रभास
2023 मधील बहुप्रतीक्षित चित्रपट ‘आदिपुरुष’चा फर्स्ट लुक सादर करण्यात आला आहे. दीर्घकाळापासून प्रभास अन् क्रीतिचे चाहते या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत. आदिपुरुषच्या निर्मात्यांनी शुक्रवारी चाहत्यांना सरप्राइज दिले आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये प्रभास हा एखाद्या योद्धय़ाप्रमाणे दिसून येत आहे. प्रभासच्या या लुकला लोकांची मोठी पसंती मिळत आहे. पोस्टर पाहून या चित्रपटात मोठय़ा प्रमाणात व्हीएफएक्स पहायला मिळणार असल्याचा अंदाज लावला जात आहे.
प्रभासने स्वतःच्या इन्स्टाग्राम हँडलवर चित्रपटाचे अधिकृत पोस्टर शेअर केले. “अयोध्येत शरयू नदीच्या काठावर एका जादुई प्रवास सुरु करताना आमच्याशी जोडले जा. चित्रपटाचे पोस्टर अन् टीझर 2 ऑक्टोबर रोजी सर्वांसमोर येईल. चित्रपट 12 जानेवारी रोजी आयमॅक्स आणि 3डीत प्रदर्शित होईल’’ असे प्रभासने याच्या कॅप्शनमध्ये नमूद केले आहे.
शरयू नदीच्या काठावर टीझर लाँच
प्रभासचे हे पोस्टर समोर आल्यावर चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. आदिपुरुषचा टीझर भगवान श्रीरामांची नगरी अयोध्येतील शरयू नदीच्या काठावर आयोजित एका कार्यक्रमात लाँच करण्यात येणार आहे. यावेळी प्रभाससोबत क्रीति तसेच अन्य कलाकार उपस्थित राहणार आहेत.
पुढील वर्षी झळकणार
आदिपुरुष 12 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळी भाषेत झळकणार आहे. चित्रपटात प्रभास हा भगवान श्रीरामाची भूमिका साकारत आहे. तर क्रीति सेनॉन ही सीतामातेच्या भूमिकेत आणि सैफ अली खान हा रावणाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊतने केले आहे.