Tarun Bharat

प्रजासत्ताक दिनी इजिप्तचे अध्यक्ष मुख्य अतिथी

24 जानेवारीला भारतात येणार अब्देल फतह अल-सिसी ः अनेक मुद्दय़ांवर होणार चर्चा

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळय़ात इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतह अल-सिसी हे मुख्य अतिथी असणार आहेत. अब्देल हे प्रजासत्ताक दिन संचलनाचा हिस्सा होण्यासाठी 24 जानेवारीपासून भारताच्या तीन दिवसीय दौऱयावर असणार आहेत. त्यांचा हा दौरा कूटनीतिच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. अल-सिसी यांच्या दौऱयामुळे दोन्ही देशांमधील भागीदारी बळकट होणार असल्याचे विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.

भारत-इजिप्त यांच्यातील राजनयिक संबंधांना 2022 मध्ये 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. याचमुळे अब्देल फतह यांचा भारत दौरा अत्यंत विशेष मानला जात आहे. दोन्ही देशांमधील भागीदारी वृद्धींगत करण्यासाठीची सुवर्णसंधी म्हणून या दौऱयाकडे पाहिले जात आहे. अध्यक्ष झाल्यावर अल-सिसी हे तिसऱयांदा भारत दौऱयावर येत आहेत. त्यांच्या या दौऱयादरम्यान अनेक मुद्दय़ांवरून चर्चा होणार आहे.

25 जानेवारीला पंतप्रधानांशी चर्चा

25 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अल-सिसी यांची चर्चा होणार आहे. या चर्चेनंतर सायबर सुरक्षा, माहिती-तंत्रज्ञान यासह अनेक क्षेत्रांमधील सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने दोन्ही देशांदरम्यान करार होण्याची अपेक्षा आहे. इजिप्तमध्ये भारताची गुंतवणूक वाढावी म्हणून अल-सीसी हे उद्योगजगताशी संवाद साधणार आहेत.

अनेक करारांची शक्यता

अध्यक्ष अब्देल फतह अल-सिसी यांच्या आगामी दौऱयादरम्यान भारत आणि इजिप्त यांच्याकडून कृषी, डिजिटल तसेच अन्य क्षेत्रांमधील सहकार्याकरता करार होणार आहेत. यात संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य हा मोठा मुद्दा ठरणार असल्याचे मानले जात आहे. परस्पर हिताच्या द्विपक्षीय, जागतिक मुद्दय़ांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत  अल-सीसा हे शिष्टमंडळ स्तरीय चर्चा करणार आहेत.

शिष्टमंडळात 5 मंत्री अन् वरिष्ठ अधिकारी

दोन्ही देशांमधील संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. इजिप्तच्या अध्यक्षांसोबत एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ दौऱयावर येणार असून यात 5 मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सामील असणार आहेत. इजिप्तच्या अध्यक्षांनी यापूर्वी ऑक्टोबर 2015 मध्ये तिसऱया भारत-आफ्रिका फोरम शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी भारताचा दौरा केला होता, त्यानंतर सप्टेंबर 2016 मध्ये त्यांनी दौरा केला होता. इजिप्तच्या अध्यक्षांना पहिल्यांदाच भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहळय़ात मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. इजिप्तच्या सैन्याची एक तुकडी देखील प्रजासत्ताक दिन संचलनात भाग घेणार आहे.

दौऱयाचे महत्त्व

अध्यक्ष सिसी यांच्या दौऱयामुळे भारत आणि इजिप्त यांच्यातील भागीदारीला अधिक बळकट करण्याची संधी प्राप्त होणार आहे. भारत इजिप्तसोबतचे संबंध वृद्धींगत करण्यासाठी इच्छुक आहे. इजिप्त हा अरब जगतासह आफ्रिकेतील महत्त्वाचा देश आहे. आफ्रिका तसेच युरोपीय बाजारपेठेसाठी इजिप्तला मुख्य प्रवेशद्वार मानले जाते.

राजस्थानात द्विपक्षीय सैन्याभ्यास

राजस्थानच्या जैसलमेरमध्ये भारत आणि इजिप्तच्या सैन्यामधील पहिला संयुक्त युद्धाभ्यास सुरू आहे. या युद्धाभ्यासाला सायक्लोन 1 नाव देण्यात आले आहे. 14 जानेवारीपासून दोन्ही देशांचे सैन्य हा युद्धाभ्यास करत आहे. संरक्षण सहकार्य मजबूत करणे आणि दहशतवादविरोधी मोहिमांचे प्रशिक्षण तसेच वाळवंटी भागातील सैन्य कौशल्य जाणून घेणे हा युद्धाभ्यासाचा उद्देश असल्याचे अधिकाऱयाने सांगितले आहे.

Related Stories

हिजाबप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा याचिका

Patil_p

सिंगापूरच्या उपग्रहांसह इस्रोची मोहीम यशस्वी

Amit Kulkarni

पंजाबला अग्रगण्य राज्याचा दर्जा मिळवून देऊ

Patil_p

मार्ग अनिश्चित काळासाठी रोखता येणार नाहीत

Amit Kulkarni

पंजाबमधील बंद ऑक्सिजन प्लँटला लष्कर देणार संजीवनी

datta jadhav

अमेरिकेच्या अहवालावर भारताचे ताशेरे

Patil_p