नवी दिल्ली / वृत्तसंस्था
यावर्षीच्या गणतंत्रदिन समारंभ आणि संचलनासाठी ईजिप्तचे अध्यक्ष फतेह अल सिसी यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण देण्यात आले आहे. त्यांनी निमंत्रणाचा स्वीकार केला असून ते 25 जानेवारीला भारतात येण्याची शक्यता आहे. 2020 आणि 2021 च्या गणतंत्रदिन कार्यक्रमासाठी कोणालाही प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले नव्हते. कोरोनाचा उद्रेक हे त्याचे कारण होते. मात्र आता ती परिस्थिती आटोक्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिसी यांना दिलेले निमंत्रण भारताचे विदेश व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी 16 ऑक्टोबर 2022 या दिवशी सिसी यांना हस्तांतरीत केले. त्यांनी या आमंत्रणाचा स्वीकार केल्या असल्याचा संदेश भारताला पाठविला आहे. त्यामुळे त्यांच्या आगमनाची निश्चिती झाली आहे. भारत आणि ईजिप्त यांच्यातील राजकीय संबंधांना या वर्षी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने त्यांना या कार्यक्रमाचे अतिथी होण्याचा मान देण्यात आला आहे.
अन्य देशांच्या प्रमुखांना या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्याची प्रथा भारताच्या स्वातंत्र्यापासून आहे. मात्र 1952, 1953, 1966, 2020 आणि 2021 अशी पाच वर्षे कोणत्याही विदेशी नेत्याला आमंत्रित करण्यात आले नव्हते. 2018 मध्ये एसिआन च्या सर्व 10 राष्ट्रप्रमुखांना या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.