35 जणांचा होणार सत्कार, मुख्यमंत्र्यांची माहिती
प्रतिनिधी /पणजी
गोव्याचा 35 वा घटकराज्य दिन सोहळा 30 मे रोजी आयोजित केला असून त्यासाठी प्रमुख पाहुणे या नात्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाचारण करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. गोवा राज्याच्या विकासासाठी योगदान दिलेल्या सुमारे 35 जणांचा त्यावेळी सत्कार होणार असून त्यात माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे.
आल्तिनो पणजी येथील निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. सावंत यांनी पुढे सांगितले की, त्याच कार्यक्रमात नवीन राजभवन इमारतीची पायाभरणी कोविंद यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
राजभवनच्या बाजूलाच नवे राजभवन
सध्या असलेल्या राजभवनच्या आवारातच एका बाजूला नवीन राजभवन बांधले जाणार असून ते काम सार्वजनिक बांधकाम खाते करणार आहे. आगामी 2 वर्षात ते पूर्ण करण्याचा इरादा असून विद्यमान राजभवनची इमारत तशीच कायम ठेवण्यात येणार आहे. नवीन इमारत बांधून पूर्ण व कार्यरत झाल्यानंतर जुन्या इमारतीचे काय करायचे ते राज्यपालांशी बोलून नंतर ठरवले जाणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.
गोव्याच्या जडणघडणीत विविध क्षेत्रात राज्याच्या विकासासाठी काम केलेल्यांचा सन्मान सदर कार्यक्रमात होणार आहे. त्यासाठी नावे शोधून काढण्याचे काम सरकारतर्फे सुरु असून ज्यांनी राज्यासाठी काम केले असेल त्यांनी माहिती प्रसिद्धी खात्याकडे अर्ज करावेत, त्यातून योग्य त्या माणसांची सन्मानासाठी निवड करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली.
अटल सेतुवरील खड्डय़ांबाबत उपाययोजना करणार
पणजीच्या अटल सेतू या तिसऱया पुलावर खड्डे पडत असल्याचा विषय आपल्या लक्षात आला असून त्याची पाहणी करून नंतर त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहे. तीन खाणी धोकादायक असल्याचे लक्षात आले असून तेथे पाणी पंप बसवले जाणार आहेत. पिसुर्ले येथील खाणीवर पंप जोडण्यात आला असून डिचोलीतील इतर दोन खाणीवर तो लवकरच बसवला जाईल, असे ते म्हणाले.
पंचायत निवडणुकीबाबत सरकारचे म्हणणे राज्य निवडणूक आयोगाला फाईलच्या माध्यमातून पाठवण्यात आले असून आता आयोगानेच काय ते ठरवून निर्णय घ्यावा, असे डॉ. सावंत यांनी नमूद केले.