Tarun Bharat

बतावणी!

जो आपला विषय नाही त्याच्याशी संबंधित वक्तव्य धाडसाने करण्यात महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना भारीच हौस. या वाचाळपणामुळे हे नेते वादग्रस्त बनतात आणि टीका झाली की माध्यमांना दोष देतात. एक वादग्रस्त बनला म्हणून पुढचा सावरत नाही. तो त्याच्याहून अधिक वादग्रस्त विधान करतो. तमाशात बतावणी हा असाच प्रकार असतो. कोरोना काळापासून तमाशा कलावंत बेरोजगार आणि उपाशी असल्याने सध्या ही बतावणी फार कमी ठिकाणी ऐकायला मिळते. मात्र युटय़ुबवर दत्ता महाडिक पुणेकर आणि गुलाब बोरगावकर तमाशा मंडळाची रंगत संगत-बहुरंगी बतावणी उपलब्ध आहे. ही बतावणी फार महत्त्वाची नसते पण प्रेक्षकांचे मनोरंजन करून इतर बाबींकडील लक्ष वळवण्यास कारणीभूत ठरते. कुठल्याही तमाशात होते तशी या बतावणीत कोण थोर? यावरून चर्चेला तोंड फुटते. मग श्रे÷त्वाच्या चर्चेपासून रावणाच्या अभिमानापर्यंत बात येते. मग एकमेकाविषयी खालच्या पातळीवर बोलले जाते. रागावलेला कलाकार दुसऱयाला तू माझ्याविषयी असं कसं बोलू शकतोस? असा प्रश्न करतो आणि मग तो व्यक्ती खुलाशासाठी थेट तुकारामांना मध्ये आणून ‘फोडिले भंडार, धन्याचा तो माल, मी तव हमाल भारवाही’ असे बोलून दुसऱयाकडे बोट दाखवतो. मग वात्रटासारखे बोलून अर्थाचे अनर्थ केले जातात. आपल्या कृतीच्या समर्थनार्थ एक जण ‘खडा टाकावा अनुभव घ्यावा मन ही खोटी होईल का?’ असा प्रश्न करतो. मध्येच एक स्त्री पात्र मग त्याला उत्तर देते. ‘टाका खडा पण उडेल शिंतोडा- त्याचा डाग कधी जाईल का?’असे उत्तर देते. त्यावरून बतावणी रंगत जाते. दोघांसमोर एक स्त्री आव्हान उभी करते म्हटल्यावर तिला वकिली पॉईंटमध्ये कसे पकडायचे याचे मनसुबे रचून एक जण दुसऱयाला तू फक्त मी म्हटलं त्याला ‘हं’ म्हणून प्रतिसाद दे, असे सांगतो. मग त्यातून चर्चेची जी राळ उडते त्याला पातळीच उरत नाही. पण मनोरंजन झालेल्या लोकांच्यातून हास्याचे फवारे, टाळय़ा, शिटय़ा येऊ लागतात. इतक्मया साऱया बतावणीत अर्धा पाऊण तास निघून जातो. एका पत्राला गाणं गाण्याची हुक्की येते… पिपाणी, ढोलकीच्या साथ संगतीने… ‘मांजरासारखं राहायाचं, कुणी कुणाला नाय बोलायाचं…. हे आसंच चालायाचं…’ असं गातो…. त्याच्या गाण्यात राजकीय, सामाजिक, जातीय संदर्भ येतात… महाराष्ट्राच्या आजच्या राजकारणात ही बतावणीची पात्रं सर्व राजकीय पक्षांमध्ये दिसून येतील. पण त्यात राजकारणातून खडय़ासारखे उचलून राजभवनात विश्रांतीला धाडलेलेही उतरल्याने गोंधळ वाढला आहे. त्यामुळे मध्येच एखाद्या सत्ताधारी नेत्याला जबाबदार पात्राप्रमाणे, रसिक जन हो शांतता राखा…. असे आवाहन करावे लागते. भगतसिंग कोश्यारी यांनी आल्यापासूनच ताळतंत्र सोडले आहे. नको ते बोलून पक्षाला अडचणीत आणतात. म. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंच्या बाबतीत अतिशय खालच्या पातळीवर जाऊन राज्यपाल हसत हसत जे बोलले, त्या वक्तव्याचा महाराष्ट्राने तीव्र निषेध केलेला होता. तरीही त्यांचे बडबडणे थांबले नाही. नुकत्याच एका कार्यक्रमात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य केले. हे वक्तव्य समर्थनीय असू शकत नाही. मात्र तरीही सत्ताधारी मंडळी राज्यपालांना झिडकारण्याऐवजी बचावात्मक, हेतू तसा नाही असे बोलत आहेत. राज्यपालांची ही वाचाळविरता महाराष्ट्र आणि भारतीय जनता पक्ष असाच खपवून घेत राहिला तर एक दिवस त्यांच्या बडबोलेपणाचा मोठा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. विरोधकच नव्हे तर स्वकियांनीही राज्यपालांना महाराष्ट्रातून हाकलून देण्याची मागणी केली आहे. मात्र केंद्र सरकार सध्या या बाबी गांभीर्याने घ्यायला तयार नाही. माध्यमांमध्ये त्यांना हटवले जाणार असल्याची चर्चा असली आणि खुद्द राज्यपालांनी तसे संकेत दिल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या असल्या तरी, हा प्रकार विरोधाची वाफ घालवण्यासाठी करण्यात आला असावा असा कार्यकर्त्यांचा अंदाज आहे. मात्र अशा वक्तव्यांच्या बाबतीत राज्यपालांचे समर्थन करणे योग्य ठरणार नाही. आपण कोणाविषयी बोलत आहोत याचे भान जर त्यांना नसेल तर त्याची शिक्षा त्यांना झालीच पाहिजे. असली शिक्षा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याच्या वेळीच केली असती तर आज सरकारवर ही वेळ आली नसती. मात्र त्यावेळी त्यांना सांभाळून घेणे आज सरकारला अडचणीचे ठरत आहे. आवाज उफाळून आला असतानाच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर फिरू लागला. यामध्ये त्यांनी शिवाजी महाराज आणि अफजलखानाचा दाखला देताना अफजलखानाने महाराजांचा कोथळा काढला असे वक्तव्य केल्याचे दिसते. बोलण्याच्या नादात अशी चूक होऊ शकते पण ही चूक एखाद्या आमदाराच्या बाबतीत समर्थनीय ठरत नाही. त्यांना आपण काय बोलतोय याचे भान असले पाहिजे. शिवाय आपल्या वक्तव्यावर नियंत्रणही असले पाहिजे. कोकण महोत्सवासारख्या एका प्रकल्पाची माहिती देताना त्याची नको ती महती सांगणे भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या अंगलट आले आहे. शिवरायांचा जन्म कोकणात झाला, रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली, त्यांचे बालपण कोकणात गेले असे कोकणाचे चुकीचे महत्त्व सांगून लाड यांनी टीका ओढवून घेतली आणि नंतर आपले ते वक्तव्य अनावधानाने झाले, आपण लगेच सुधारणा केली असा खुलासा केला. त्यांच्यावर जोराची टीका झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अगदी प्राथमिक शालेय पुस्तकात शिकवला तेवढा जरी माहिती असला तरीही एखादे बालक करणार नाही अशी चूक प्रसाद लाड करून बसले. त्यांच्यासाठी हा दिलगिरीपुरताचा विषय असला तरी महाराष्ट्रात याबाबत संताप निर्माण होणे स्वाभाविक आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबतीत सरकारवर जोराची टीका करणेही अपेक्षितच होते. सलग घडलेल्या घटना, त्याला रावसाहेब दानवे, देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस यांच्यासह अनेकांकडून मिळालेले समर्थन या पार्श्वभूमीवर संताप व्यक्त होणे शक्मय आहे. माध्यमांना किंवा इतर पक्षांना दोष देण्याचे कारण नाही. अजित पवार यांनी धरणाच्या बाबतीत केलेले वक्तव्य ही माध्यमांनी, वृत्तपत्रांनी लावून धरले होते. बोलण्याच्या ओघात जरी वक्तव्य केले तरी ज्यातून जनतेत संताप निर्माण होतो अशा बाबी लावून धरणे हे पत्रकारितेकडून अपेक्षितच असते.

Related Stories

दिधलीं द्रव्यें तें ऐकें

Patil_p

शाळेची घंटा

Patil_p

सहाव्या सत्रात शेअरबाजार नव्या उंचीवर

Patil_p

भारतीय स्टार्टअप्सची प्रगतीशील वाटचाल

Patil_p

नाते आकार घेताना…

Patil_p

मठाधीशांसाठी धोकादायक ‘पिंजरा’

Amit Kulkarni