वृत्तसंस्था /लखनौ
ऑस्ट्रेलियात होणाऱया आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतून दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ड्वेन पेटोरियसला दुखापतीमुळे बाहेर पडावे लागत आहे.
दक्षिण आफ्रिका संघातील अष्टपैलू प्रेटोरियस याच्या डाव्या हाताच्या अंगठय़ाचे हाड मोडल्याने तो आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत खेळू शकणार नाही, अशी घोषणा क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने केली आहे. गेल्या वर्षी झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत प्रेटोरियसने सर्वाधिक बळी नोंदविले होते. या स्पर्धेत दोन गोलंदाजांनी सर्वाधिक समान गडी बाद केले होते. भारताविरुद्ध इंदौर येथे झालेल्या तिसऱया टी-20 सामन्यात खेळताना प्रेटोरियसला ही दुखापत झाली होती. इंदौरच्या सामन्यात प्रेटोरियसने 26 धावात 3 गडी बाद करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. पण भारताने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. 2022 च्या क्रिकेट हंगामात प्रेटोरियसने आठ टी-20 सामन्यात 20.66 धावांच्या सरासरीने 12 गडी बाद केले आहेत. ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱया आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी आता प्रेटोरियसच्या जागी जेनसेनला संधी मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या स्पर्धेसाठी घोषित करण्यात आलेल्या दक्षिण आफ्रिका संघामध्ये जेनसेनचा राखीव खेळाडूत समावेश करण्यात आला होता.