Tarun Bharat

भ्रष्टाचार, घराणेशाहीवर पंतप्रधानांचा प्रहार

Advertisements

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी देशाला संबोधन

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. त्यानंतर देशाला संबोधून केलेल्या भाषणात त्यांनी भ्रष्टाचार आणि परिवारवाद या दोन्ही मुद्दय़ांवर परखडपणे भाष्य केले. देशवासियांसमोर ही दोन मोठी आव्हाने असल्याचे सांगत या विकृतींविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन त्यांनी केले. यासोबतच पुढील 25 वर्षांत ‘विकसित भारत’ सुनिश्चित करण्यासाठीची ‘पंचसुत्री’ही त्यांनी दिली. देशाची विविधता, जनतेची एकजूट, स्त्री-पुरुष समानता, संशोधन आणि नावीन्यता त्याचबरोबर संघराज्य व्यवस्थेबद्दलही मोदी यांनी भाष्य केले. स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत असून देशासाठी हा एक ऐतिहासिक दिवस आहे. या दिवसापासून एक नवीन संकल्प घेऊन पुढे जाण्याची ही वेळ आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

विकासातील अडथळे असलेला भ्रष्टाचार आणि घराणेशाहीला देशातून हद्दपार करण्याची वेळ आली आहे. नागरिकांनी या दोन गोष्टींचा तिरस्कार करावा, असे आवाहन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 25 वर्षांत देशाला ‘विकसित’ देश बनवण्यासाठी पाच संकल्प जाहीर केले. 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून त्यांनी सलग नवव्यांदा भाषण केले. देशात विकसित करण्यात आलेल्या 21 हॉवित्झर तोफांच्या सलामीत पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. लाल किल्ल्यावरून गेल्या 75 वर्षांत प्रथमच देशी बनावटीच्या तोफांची सलामी राष्ट्रध्वजाला दिली गेली.

पुढील 25 वर्षांचे ध्येय आपण आताच निश्चित केले पाहिजे. आज स्वातंत्र्य भारत अमृतमहोत्सव साजरा करत असून ‘शताब्दी’ गाठताना मोठे ध्येय समोर ठेवले पाहिजे. ते मोठे ध्येय म्हणजे ‘विकसित भारत’ हे आहे. देशाला वाळवीप्रमाणे पोखरणाऱया भ्रष्टाचाराविरोधातील लढाईच्या निर्णायक टप्प्यात आपण प्रवेश केला आहे. घराणेशाहीचे आव्हान केवळ राजकारणापुरते मर्यादित नसल्याचे स्पष्ट करताना घराणेशाही आणि भ्रष्टाचाराला नागरिकांनी विरोध केला पाहिजे, असे ते म्हणाले.

संरक्षण दलांच्या योगदानाला कौतुकाची थाप

अतिवेगवान क्रूझ क्षेपणास्त्र ‘ब्राह्मोस’च्या निर्यातीचा उल्लेख करतानाच आत्मनिर्भर भारताच्या संकल्पात संरक्षण दलाने दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. त्याचबरोबर लाल किल्ल्यावरून प्रथमच सलामी देणाऱया देशी बनावटीच्या 21 हॉवित्झर तोफांचाही उल्लेख केला. या तोफा ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) पुढाकारातून विकसित करण्यात आल्या असल्याचे सांगत त्यांनी जवानांचे अभिनंदनही केले.

संशोधन-नवनिर्मितीसाठी ‘जय अनुसंधान’ची घोषणा

आगामी 25 वर्षांना मोदी यांनी ‘अमृतकाल’ असे संबोधले आहे आणि या अमृतकालात प्रत्येक नागरिक मोठय़ा उत्साहात आणि अधीरतेने नव्या भारताची प्रगती पाहण्याची आकांक्षा बाळगून असल्याचे सांगितले. पंतप्रधानांनी संशोधन आणि नवनिर्मितीला चालना देण्यासाठी ‘जय अनुसंधान’ ही घोषणा केली. महिलांच्या सन्मानासह अनेक बाबींवर पंतप्रधानांनी भर दिला, परंतु कोणताही नवा उपक्रम किंवा योजना त्यांनी जाहीर केली नाही.

महिलांचा आदर करा!

‘महिलांचा सन्मान’ हा देशाच्या विकासाचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. आपल्या वक्तव्यांतून आणि वर्तनातून महिलांचा अवमान होईल, अशी कोणतीही गोष्ट न करणे महत्त्वाचे आहे, असे मोदी यांनी नमूद केले. आमच्या आचरणात एक विकृती निर्माण झाली आहे. आम्ही कधीकधी महिलांचा अवमान करतो, असे निदर्शनास आणून, ‘आपण आपल्या वर्तनात सुधारणा करण्याची आणि अशा गोष्टींपासून मुक्त होण्याची शपथ घेऊ शकतो का? असा प्रश्नही त्यांनी विचारला.

पाच प्रतिज्ञांचा संकल्प

देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचे ‘पंचप्रण’ म्हणून त्यांनी पाच प्रतिज्ञांचा उल्लेख केला. त्यांत वसाहतवादी मानसिकतेच्या कोणत्याही खुणा नष्ट करणे, वारशाचा अभिमान, ऐक्मयाची ताकद अबाधित ठेवणे, पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांसह सर्व नागरिकांनी आपली कर्तव्ये पार पाडणे आदींचा समावेश आहे. आपल्याला हे पाच संकल्प नजरेसमोर ठेवून पुढे जायचे आहे. त्यामुळे आगामी 25 वर्षांत आपल्या स्वातंत्र्यसेनानींची स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी स्विकारली पाहिजे, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

महात्मा गांधीजींची इच्छा पूर्ण करणार!

गेल्या 75 वर्षांतील देशाच्या कामगिरीबद्दल समाधानी न राहता आता स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत म्हणजे येत्या 25 वर्षांत ‘पंचप्रण’ पूर्ण करण्यावर आपले सामर्थ्य आपल्याला केंद्रित करावे लागेल, असा निर्धार मोदी यांनी व्यक्त केला. रांगेतील शेवटच्या माणसाला सक्षम करण्याची महात्मा गांधींची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी स्वतःला झोकून दिले आहे, असा दावा मोदी यांनी केला. हा ‘अमृतकाल’ आम्हाला एका महत्त्वाकांक्षी समाजाची स्वप्ने आणि उद्दिष्टे पूर्ण करण्याची सुवर्णसंधी देत आहे, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

error: Content is protected !!