शंभराव्या वाढदिवशी पदप्रक्षालन करून घेतले आशीर्वाद ः विशेष ब्लॉग लिहून आठवणींना उजाळा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांनी शनिवारी वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निवासस्थानी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी सकाळी आपल्या मातेचे पदप्रक्षालन करून (पाय धुवून) त्यांचे आशीर्वाद घेतले. काही वेळ त्यांनी मातेसमवेत व्यतित केला. त्यानंतर मातेच्या सन्मानार्थ त्यांनी ब्लॉगही प्रसारीत करून आठवणींना भावपूर्ण उजाळा दिला आहे.
माझी आई जितकी साधी तितकीच असामान्य आहे. इतर सर्व मातांप्रमाणेच ती महान आहे, असे त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे. हा ब्लॉग हिंदी आणि इंग्रजीसह अनेक भारतीय भाषांमध्ये भाषांतरीत करण्यात आला आहे. आपल्या आईने केवळ दोनवेळा आपल्यासह सार्वजनिक कामात भाग घेतला होता. श्रीनगर येथील लाल चौकात मुरली मनोहर जोशी यांच्या एकता यात्रेची सांगता होऊन तिरंग्याचे ध्वजारोहण झाल्याच्या आनंदाप्रित्यर्थ गुजरातमधील अहमदाबाद येथे समारंभ करण्यात आला होता. त्या समारंभात आपल्या आईने आपल्या कपाळी तिलक लाऊन आपल्याला आशीर्वाद दिले होते. त्यानंतर 2001 मध्ये आपण गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहून आईने आशीर्वाद दिले होते. अशा दोन हृदय़ आठवणी त्यांच्या ब्लॉगमध्ये आहेत.
आई हीच माझी प्रथम आणि सर्वात महत्त्वाची शिक्षिका आहे. तिचा सार्वजनिक सत्कार व्हावा, अशी माझी इच्छा होती. तशी योजनाही आखण्यात आली होती. तथापि आईने अशा सत्काराला ठाम नकार दिला. मी एक सामान्य व्यक्ती आहे. माझ्या सत्काराची आवश्यकता नाही. मी तुझा जन्म दिला असला तरी तुझे भरन पोषण परमेश्वरानेच केले आहे. त्यामुळे माझ्या सत्काराची आवश्यकता नाही, असे आईने सांगितल्याची आठवण त्यांच्या ब्लॉगमध्ये वाचावयास मिळते. आपल्याकडून धुळाक्षरे गिरवून घेणारे शिक्षक जेठाभाई जोशी यांचा सत्कार करण्याचा आग्रह मात्र आईने आवर्जुन केला होता. तिचा त्याग असिम आहे. आपल्या मातेची आई तिच्या जन्मानंतर लगेच निर्वतली. त्यामुळे आपल्या आईला मातृसुख मिळालेच नाही. मात्र, आपल्या सर्व मुलांवर निस्सीम माया करून तिने आपल्या बालपणीची त्रुटी भरून काढली आहे, असे गौरवोद्गार ब्लॉगमध्ये आहेत.
स्वच्छतेची आवड
बालपणापासून आईने लावलेली सर्वात मोठी सवय स्वच्छतेची होती. आपला परिसर आणि घर ती नेहमी आरशासारखी स्वच्छ ठेवीत असे. इतर घरांमध्ये कामे करून ती तुटपुंज्या उत्पन्नाच्या आपल्या संसाराला हातभार लावीत असे. चरखा चालवून सूत कातून ते विकून संसाराला साहाय्यही तिने केले आहे. अशा अनेक आठवणी पंतप्रधान मोदींनी या ब्लॉगमध्ये लिहिलेल्या दिसून येतात.