नवी दिल्ली / वृत्तसंस्था
शीख गुरू तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वानिमित्त (जयंती) पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. नवव्या शीख गुरूंच्या प्रकाश पर्व कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्रालयाने सोमवारी दिली. याप्रसंगी एक स्मृती नाणे आणि टपाल तिकीटही जारी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सरकारकडून भव्य स्वरूप देण्याची तयारी सुरू आहे. यावेळी 400 ‘रागी’ शीख वादक लाल किल्ल्यावर शब्द कीर्तन करणार आहेत.
‘आझादी का अमृत महोत्सवां’तर्गत देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. दिल्लीतील हा कार्यक्रमही त्यांच्या नेतृत्त्वाखाली होणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शीख समाजालाही आकर्षित करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. सांस्कृतिक मंत्रालय दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, बडय़ा व्यक्ती आणि विदेशातील लोकही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
शीख समुदायाशी जवळिकतेचा प्रयत्न
शेतकरी आंदोलनादरम्यान सरकारवर शीखविरोधी वृत्ती बाळगल्याचा आरोप करण्यात आला. याशिवाय पंजाब विधानसभा निवडणुकीतही भाजपला मोठय़ा विरोधाचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीत पंजाब आणि शीख समाजाला संदेश देण्याच्या उद्देशाने या भव्य कार्यक्रमाची तयारी केली जात असल्याचे मानले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीही अनेकदा शीख धर्मियांच्या धार्मिक कार्यक्रमात भाग घेतला आहे. शीख समाजातील लोकांना भाजपकडे आकर्षित करण्यासाठी सरकारनेही हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.