शिक्षक दिन आज
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी शिक्षकदिनी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना भेटणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने यासंबंधीची माहिती दिली आहे. शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्याचा उद्देश देशाच्या सर्वोत्तम शिक्षकांच्या अद्वितीय योगदानाचा उत्सव साजरा करणे आणि त्यांचा सन्मान करणे आहे. या शिक्षकांनी स्वतःची प्रतिबद्धता तसेच अथक परिश्रमाने शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधार करण्यासह विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध केल्याचे पीएमओने म्हटले आहे.
शिक्षक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांची सोमवारी नवी दिल्ली येथील लोक कल्याणमार्गावरील स्वतःच्या शासकीय निवासस्थानी भेट घेणार आहेत असे सांगण्यात आले.
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार हे प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत उत्कृष्ट शिक्षकांना प्रदान केले जातात. यंदा या पुरस्कारांसाठी देशभरातून 45 शिक्षकांची निवड तीन टप्प्यांच्या एका पारदर्शक ऑनलाइन प्रक्रियेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र आणि तेलंगणासह विविध राज्यांमधील शिक्षकांना हा पुरस्कार मिळणार आहे. पुरस्कार सोहळा नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित केला जाणार असून दूरदर्शन आणि अन्य वाहिन्यांवर याचे थेट प्रसारण केले जाणार आहे. माजी राष्ट्रपती डॉ. एस. राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त देशात शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. राधाकृष्णन यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले होते.