मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या कार्याचे कौतुक ः 1448 कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण
अहमदाबाद / वृत्तसंस्था
तीन दिवसांच्या गुजरात दौऱयावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध भागांमध्ये कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. सोमवारी गुजरातमधील भरूच, आणंद आणि अहमदाबाद येथील तीन कार्यक्रमांना हजेरी लावली. याप्रसंगी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात अनेक महत्त्वाचे संदेश दिले. आणंदमध्ये पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचे कौतुक केले. राज्याला कुशल आणि अनुभवी राजकीय नेतृत्त्व मिळाल्याचे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी विविध प्रकल्पांचे लोकार्पण केले. तसेच जाहीर सभेलाही संबोधित केले. गुजरात आणि भाजपचे अतूट नाते आहे. आज कुणी गुजरातबद्दल बोलले तर भाजप दिसतो आणि भाजपबद्दल बोलले तर गुजरात दिसतो. हय़ा नात्यामध्ये आपलेपणाची भावना आहे, असे ते म्हणाले. गुजरातमध्ये भाजप म्हणजे सेवा, भाजप म्हणजे माता-भगिनींचे रक्षण, गुजरात भाजप म्हणजे शांतता असे समीकरण जुळल्याचेही त्यांनी नमूद केले. गुजरातमध्ये व्यवसायासाठी उत्तम वातावरण असून त्याचा अधिकाधिक लाभ उठविण्याचे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांना प्रशासनाचा मोठा अनुभव आहे. त्यांच्यासारखे अनुभवी नेतृत्त्व मिळणे हे तुमचे भाग्य आहे, असेही पंतप्रधान आपल्या संबोधनात म्हणाले.
जामनगरमध्ये रोड शो
भरूच, आणंद येथे अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर ते अहमदाबादहून जामनगरला पोहोचले. येथे त्यांनी रोड शो दरम्यान कारमधून खाली उतरून लोकांचे अभिवादन स्विकारले. यानंतर 1,448 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. सोमवारी रात्री पंतप्रधान जामनगरमध्ये मुक्काम करणार असून मंगळवारी सकाळी गांधीनगरला रवाना होतील. तत्पूर्वी, पंतप्रधानांनी अहमदाबादमधील शैक्षणिक संकुलाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. कॅम्पसमध्ये बांधलेले वसतिगृह हे गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संकुल ठरेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. येथील 12 मजली वसतिगृहात 116 खोल्या असून 400 हून अधिक विद्यार्थ्यांसाठी निवास आणि भोजनाची सोय करण्यात आली आहे.