सुरक्षा दलांसाठी 84,328 कोटींचे 24 प्रस्ताव मंजूर ः चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
तवांगमध्ये चीनसोबत झालेल्या झटापटीनंतर लष्कर आणि सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. संरक्षण अधिग्रहण परिषदेने (डीएसी) 84 हजार 328 कोटी रुपयांच्या 24 प्रस्तावांना मंजुरी दिली. मंजुरी देण्यात आलेल्या प्रस्तावांमध्ये माउंटेड गन सिस्टिम, लष्करी वाहने आणि रडार यंत्रणा खरेदीचा समावेश असल्याचे संरक्षण अधिकाऱयांनी सांगितले. सदर 24 प्रस्तावांमध्ये भारतीय लष्करासाठी 6, हवाई दलासाठी 6, भारतीय नौदलासाठी 10 आणि भारतीय तटरक्षक दलासाठी 2 प्रस्तावांचा समावेश आहे.
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे. भारतीय सैन्यासाठी भविष्यकालीन इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकल्स, लाईट टँक, माउंटेड गन सिस्टीम यासह अनेक शस्त्रास्त्रांसाठी केलेले प्रस्ताव स्वीकारले आहेत. त्यानुसार आता भारतीय हवाई दलाला नवीन श्रेणीची क्षेपणास्त्र प्रणाली, लांब पल्ल्याच्या बॉम्ब आणि प्रगत पाळत ठेवणारी यंत्रणा दिली जाईल, असे ते पुढे म्हणाले. आता हवाई दल अधिक मजबूत होईल. याशिवाय भारतीय तटरक्षक दलासाठी नव्या पिढीच्या गस्ती जहाजांची खरेदी करण्यात येणार आहे.
9 डिसेंबर रोजी 300 हून अधिक चिनी सैनिक अरुणाचलच्या तवांगमधील 17 हजार फूट उंच शिखरावर कब्जा करण्याचा प्रयत्न असताना भारतीय सैनिकांनी त्यांना पळवून लावले होते. चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करताच सज्ज भारतीय जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर देत त्यांचा पाठलाग केला. यादरम्यान भारतीय लष्कराचे 6 जवान जखमी झाले होते. या झटापटीनंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.