कोलवाळ तुरुंगातील एकाला अटक, एनसीबीने मडगावच्या न्यायालयाला दिलेली माहिती
प्रतिनिधी/ मडगाव
कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात असलेल्या एका व्यक्तीकडून आलेल्या सुचनेनुसारच दोन पिस्तुले गोव्यात आणण्यात आली होती आणि मडगाव रेल्वे स्थानकाबाहेर पार्क केलेल्या एका वाहनातील व्यक्तीला हे ‘घबाड’ देण्यात येणार होते अशी माहिती भारत सरकारच्या एनसीबीच्या अधिकाऱयांनी मडगावच्या न्यायालयाला माहिती दिली.
राजस्थानातील बारमार जिल्ह्यातील थाना राम या 22 वर्षीय संशयित आरोपीला मडगाव रेल्वे स्थानकावर जवळ जवळ दोन महिन्यापूर्वी म्हणजे 6 एप्रिल 2022 रोजी अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून 4.3 किलो गांजा आणि 18 जिवंत काडतुसांसह दोन स्टार पिस्तूले जप्त करण्यात आली होती.
या संशयित आरोपीने मडगावच्या न्यायालयात आपल्याला जामिनावर सोडण्यात यावे म्हणून अर्ज केला होता. न्यायालयाने या संशयिताला जामिनावर सोडण्याचा आदेश दिला. या प्रकरणाची पार्श्वभूमी न्यायालयाने ऐकून घेतली.
कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात असलेल्या दिलीपकुमार नावाच्या एका व्यक्तीकडून वरील ‘घबाड’ गोळा करण्याची सुचना मिळाली होती. या सुचनेनुसार वरील संशयित आरोपीने 4.3 किलो गांजा आणि दोन पिस्तूले महाराष्ट्रातील शिरपूर येथून शेरु आणि पिंटू यांच्याकडून गोळा केली होती. हे ‘घबाड’ हा संशयित आरोपी मडगाव रेल्वे स्थानकाच्या बाहेर पार्क करुन ठेवलेल्या एका वाहनातील व्यक्तीकडे देणार होता.
या प्रकरणाची माहिती आरोपी थाना राम याने एनसीबीला दिल्यानंतर या तपास यंत्रणेने कोलवाळ कारागृहात असलेल्या दिलीपकुमार यालाही ताब्यात घेऊन त्यालाही अटक केली. चौकशीच्यावेळी आपण वरील संशयित आरोपीला वरील घबाड आणण्यासाठी ऑडियो व्हॉट्सअप मेसेज पाठवला होता अशी त्याने एनसीबीकडे कबुली दिली.
ज्या कोणी हे ‘घबाड’ पुरविले त्या व्यक्तीचा तसेच हे ‘घबाड’ घेण्यासाठी येणाऱयाचा अजून तपास लागलेला नसल्यामुळे आरोपी थाना राम याला जामिनावर सोडू नये अशी एनसीबीने न्यायालयाला विनंती केली होती.
या प्रकरणातील आरोपी थाना राम याला आणखी कोठडीत ठेवल्यामुळे हा प्रकरणाचा तपास कसा काय पुढे जाणार कळत नसल्याचे सांगून कडक अटी घालून या संशयित आरोपीला जामिनावर सोडता येईल असे सांगून न्यायालयाने आरोपी थाना राम याला 50 हजार रुपयांच्या जामिनावर तसेच तितक्याच रकमेच्या दोन हमीदारावर जामिनावर सोडण्याचा आदेश दिला. त्याशिवाय या आरोपीने गोव्याबाहेर तसेच देशाबाहेर जाता कामा नये यासह न्यायालयाने आणखी अनेक अटी घातलेल्या आहेत.
या अटीपैकी कोणत्याही एका अटीचा आरोपी थाना राम याने भंग केल्यास त्याचा जामीन रद्द होईल असेही न्यायालयाने आदेशात म्हटलेले आहे.