Tarun Bharat

कचरा विल्हेवारीसाठी खासगी कंपन्या इच्छुक

विविध व्यावसायिक संघटनांना महानगरपालिका बैठकीत दिली प्रकल्पाची माहिती

प्रतिनिधी /बेळगाव

मोठय़ाप्रमाणात कचऱयाचे उत्पादन करणाऱया व्यावसायिकांकडील कचऱयाची उचल करून त्यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी खासगी कंपनीकडे सोपविण्याचा विचार मनपाने चालविला आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी मंगळवारी मनपा कार्यालयात विविध व्यावसायिक संघटनांच्या पदाधिकाऱयांची बैठक झाली. नव्या उपक्रमास व्यावसायिकांनी पसंती दर्शविली. पण खर्चिक प्रस्ताव राबविण्यास आक्षेप घेण्यात आला.

कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने अनेकवेळा विविध उपक्रम राबविण्याची सूचना हॉटेल, भाजीमार्केट, फळमार्केट व मोठय़ाप्रमाणात कचरा उत्पादन करणाऱया व्यावसायिकांना केली होती. पण याबाबत कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे आता खासगी कंपनीद्वारे खतनिर्मितीचा प्रकल्प राबवून कंपनीकडून कचऱयाची उचल करण्याचा प्रस्ताव आहे. त्याकरिता खासगी कंपनी आणि महापालिकेचा करार करण्याचा विचार आहे. हॉटेल आणि भाजीमार्केट, फळमार्केटमध्ये कचऱयाचे उत्पादन मोठय़ाप्रमाणात होते. त्यामुळे मोठय़ाप्रमाणात उत्पादित करण्यात येणाऱया कचऱयाची उचल महापालिका करणार नाही. त्याची विल्हेवाट कचरा उत्पादकांनी करावी, अशी नोटीस बजाविण्यात आली होती. पण  व्यावसायिकांनी कोणत्याच उपाय-योजना हाती घेतल्या नाहीत. त्यामुळे महापालिकेनेच खासगी कंपनीद्वारे प्रकल्प राबविण्याचा विचार चालविला आहे.

या प्रस्तावाची माहिती हॉटेल व्यावसायिक, भाजीमार्केट, फळमार्केट, बांधकाम व्यावसायिक संघटनांच्या पदाधिकाऱयांना देण्यात आली. मुंबई स्थित कंपनीच्या पदाधिकाऱयांनी कचऱयाच्या विल्हेवारीबाबत प्रकल्पाची माहिती दिली. कचऱयापासून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. सर्वप्रकारच्या कचऱयाची उचल केली जाईल. पण याकरिता साडेआठ कोटांचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. कचरा जमा करण्याबरोबरच त्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रक्रिया करावी लागणार आहे. याकरिता प्रति किलोप्रमाणे पैशांची आकारणी केली जाणार आहे. याकरिता व्यावसायिकांना कंपनीकडे अनामत रक्कम ठेवावी लागणार आहे. तसेच कंपनी व व्यावसायिकांमध्ये पाच वर्षांचा करार करण्यात येणार आहे.

अनामत रक्कम भरावी लागणार

अनामत रक्कम भरल्यास सात रुपये साठ पैसे प्रति किलो कचऱयासाठी शुल्क भरावा लागणार आहे. अनामत रक्कम न भरल्यास अकरा रुपये तीस पैसे शुल्क भरावा लागणार आहे, अशी माहिती व्यावसायिकांना देण्यात आली. दररोज कचऱयाची उचल करून त्याचवेळी वजन करून त्याची नोंद ठेवली जाईल व प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात व्यावसायिकांना बिल द्यावे लागणार आहे. असा विविध तपशील सांगण्यात आला.पण कचऱयासाठी आकारण्यात येणारी रक्कम मोठय़ाप्रमाणात आहे. दररोज शंभर किलो कचरा उत्पादन करणाऱया व्यावसायिकांना अकरा रुपये प्रमाणे रक्कम भरावी लागणार आहे. त्यामुळे महिन्याअंती 33 हजार रुपयांची रक्कम भरावी लागणार आहे.

जर अशाप्रकारे रक्कम भरावी लागणार असल्यास व्यावसायिक कचरा देणार नाहीत. शहरातील कोणत्याही ठिकाणी कचरा टाकून निघून जातील, त्यामुळे व्यावसायिकांकडून कमी रक्कम आकारता येईल, असा प्रकल्प राबविण्यात यावा, अशी सूचना फळमार्केट संघटनेच्या पदाधिकाऱयांनी केली.

यावेळी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ, पर्यावरण साहाय्यक कार्यकारी अभियंते एच. व्ही. कलादगी तसेच विविध व्यावसायिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

भाजीमार्केटमध्ये दररोज 10 टन कचरा

भाजीमार्केटमध्ये दररोज 10 टन कचऱयाचे उत्पादन होते. त्यामुळे ही रक्कम मोठय़ाप्रमाणात भरावी लागणार आहे. पण महापालिकेने कचऱयापासून वीजनिर्मिती करून परिसरातील पथदीपांसाठी विजेचा वापर करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र खतनिर्मितीचा प्रस्ताव खर्चिक आहे. त्यामुळे याबाबत चर्चा करण्यापूर्वी भाजीमार्केटमधील कचऱयाची पाहणी करावी. सर्व माहिती घेऊन कोणता प्रकल्प राबवावा, याबाबत चर्चा करावी, अशी सूचना भाजीमार्केट संघटनेच्या पदाधिकाऱयांनी मांडली. यावेळी बांधकाम व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक व अन्य व्यावसायिकांनी प्रश्न उपस्थित केले. व कमी खर्चाचा प्रकल्प अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले.

Related Stories

सिलिंडरचे दर कमी करण्यासह कुत्र्यांचा बंदोबस्त करा

Amit Kulkarni

रामतीर्थनगर येथील उद्यान विकासाच्या प्रतीक्षेत

Amit Kulkarni

कोणत्याही यशाला शॉर्टकट नाही!

Amit Kulkarni

जिल्हय़ातील 21 केंद्रांवर पार पडली ‘नीट’ परीक्षा

Patil_p

जिव्हाळा संस्थेतर्फे वृद्धाश्रमात ‘फादर्स डे’

Omkar B

खानापूर वकील संघटनेच्या सर्व कर्मचाऱयांनी घेतली कोरोना लस

Patil_p