अभिनेत्रीच्या नाक अन् ओठातून निघाले रक्त
अभिनेत्री प्रियांका चोप्रा स्वतःच आगामी हॉलिवूड वेबसीरिज ‘सिटाडेल’च्या चित्रिकरणादरम्यान जखमी झाली आहे. याची माहिती प्रियांकाने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्वतःच्या चाहत्यांना दिली आहे. या पोस्टमध्ये तिने एक छायाचित्र शेअर केले असून यात तिच्या चेहऱयावर काही जखमा झाल्याचे दिसून येते.
छायाचित्रात अभिनेत्रीच्या ओठ आणि नाकानजीक रक्त दिसून येते. यापूर्वी देखील प्रियांकाने सीरिजच्या सेटवरून दोन छायाचित्रे शेअर केली होती. प्रियांका चालू वर्षाच्या प्रारंभापासून लंडनमध्ये वेबसीरिजचे चित्रिकरण करत आहेत. मागील अनेक महिन्यांपासून ती लंडनमध्येच वास्तव्यास आहे. सिटाडेल सीरिजमध्ये प्रियांका एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसून येणार आहे. या सीरिजमध्ये प्रियांकासोबत रिचर्ड मॅडन आणि पेड्रो लिएंड्रो देखील मुख्य भूमिका साकारत आहेत. सिटाडेल ही सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइमवर पहायला मिळणार आहे.
प्रियांकाने यापूर्वी ‘टेक्स्ट फॉर यू’ या हॉलिवूड चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केले होते. प्रियांका लवकरच आलिया भट्ट आणि कॅटरिना कैफ यांच्यासोबत ‘जी ले जरा’ या हिंदी चित्रपटात दिसून येईल. तर ‘मॅट्रिक्स 4’, ‘इट्स ऑल कमिंग बॅक टू मी’ आणि ‘एंडिंग थिंग्स’ या हॉलिवूड पटांमधून ती लवकरच झळकणार आहे.