वार्ताहर / कास :
अखिल भारतीय बोर्ड विशेषज्ञ परीक्षेमध्ये महाराष्ट्र अंगुली मुद्रा केंद्र विभागातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रियंका संकपाळ-जाधव यांनी सुयश मिळवत देशात पहिला येण्याचा मान मिळवला. दिल्ली येथील नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो यांच्या वतीने ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत प्रियंका यांनी 250 पैकी 224 गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकवला. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.
तब्बल 20 वर्षांनंतर प्रियंका यांनी फिंगरप्रिंट विभागाची मानाची समजली जाणारी सर अजीज-उल-हक ट्रॉफी महाराष्ट्राला मिळवून दिली. या परीक्षेत देशातील विविध राज्यातील एकूण 76 फिंगरपिंटचे अधिकारी उपस्थित होते. ही परीक्षा लेखी, प्रात्यक्षिक व मुलाखत स्वरूपात घेण्यात आली होती. विशेष म्हणजे फिंगरपिंट विभागातील अत्यंत कठीण परीक्षेत त्यांनी हे यश मिळवले आहे. प्रियंका या सध्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून सीआयडी पुणे येथे कार्यरत आहेत. सातारा तालुक्यातील अतिदुर्गम अशा धावली गावच्या त्या रहिवाशी आहेत.
मुख्यमंत्र्यांनीही केले अभिनंदन
फिंगरप्रिंट विभागातील सर्वांत आव्हानात्मक आणि अवघड अशा या परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रियंका यांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. आपल्या देशाला, राज्याला चांगल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची गरज आहे. हे उमेदवार नागरी सेवेमध्ये ज्या ठिकाणी नियुक्त होतील, त्याठिकाणी आपल्या कामाचा ठसा निश्चितपणे उमटवतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.