प्रतिनिधी/ बेळगाव
ख्रिसमसनिमित्त ‘तरुण भारत’च्या ‘मी ऊर्जिता’ व्यासपीठातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ख्रिसमस गिफ्ट हॅम्पर, क्रीब (ख्रिस्त जन्माचा देखावा) व रिथ बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद लाभला.
स्पर्धेअंतर्गत गिफ्ट हॅम्पर तयार करतानाचा व्हिडीओ स्पर्धकांनी पाठवावयाचा होता. क्रीब आणि रिथचे परीक्षण प्रत्यक्ष स्पर्धकांच्या घरी जाऊन करण्यात आले. मुख्य म्हणजे ख्रिस्त धर्माचा अभ्यास असणाऱ्या विविध चर्चच्या फादरना परीक्षक म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.
त्यांच्याच उपस्थितीत स्पर्धकांना बक्षिसेही देण्यात आली. बेळगावमध्ये झालेल्या कार्यक्रमात शहापूर येथील माऊंट मेरी कार्मेल चर्चचे फादर अॅलेक्स डिव्रुज उपस्थित होते. तसेच ‘तरुण भारत’च्या कार्यकारी संचालक रोमा ठाकुर, संपादक जयवंत मंत्री व जनसंपर्क प्रमुख गिरीधर शंकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना फादर डिव्रुज यांनी ‘तरुण भारत’ने ख्रिसमसच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या स्पर्धेबद्दल विशेष आनंद व्यक्त करून ‘तरुण भारत’मध्ये सर्वच घटकांना स्थान मिळते, असे सांगितले. पुढील वर्षीसुद्धा ही स्पर्धा घ्यावी, त्याला आपण सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यानंतर स्पर्धेतील पहिले तीन क्रमांक उचगाव (ता. बेळगाव) येथील राजू फर्नांडिस, कॅम्प येथील शामीन कोएलो व टिळकवाडी येथील ऑगस्टिन फर्नांडिस यांनी पटकाविले. त्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. सर्वच स्पर्धकांनी या स्पर्धेने आपल्या कला-कौशल्याला वाव दिला, असे सांगून ‘तरुण भारत’ला धन्यवाद दिले. स्वागत व प्रास्ताविक करून मनीषा सुभेदार यांनी सूत्रसंचालन केले.