लोकमान्य को-ऑप. सोसायटीचा उपक्रम : किल्ला स्पर्धेला बेळगाव-उपनगरांमधून भरभरून प्रतिसाद : बालचमूंसह तरुणाईमध्ये उत्साह
प्रतिनिधी /बेळगाव
लोकमान्य सोसायटीतर्फे आयोजित दिवाळी किल्ला स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. विजेत्या मंडळांना रविवारी बक्षीस वितरण करण्यात आले. सोसायटीच्या संचालकांच्या हस्ते 2021 व 22 मधील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन लोकमान्य सोसायटीचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. संचालक गजानन धामणेकर, पंढरी परब, सुबोध गावडे, प्रभाकर पाटकर, विठ्ठल प्रभू, चिफ सेक्मयुरिटी ऑफिसर कर्नल दीपक गुरूंग व परीक्षक मंडळ यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
शिवरायांची युद्धनीती-गनिमी काव्याचा भारतीय लष्करावर प्रभाव
पंढरी परब यांनी स्वागत व प्रास्ताविक करत मागील 25 वर्षांपासून किल्ला स्पर्धेचे आयोजन करत असल्याचे सांगितले. किल्ला स्पर्धेला बेळगाव व उपनगरांमधून भरभरून प्रतिसाद मिळत असून दरवषी सहभागींची संख्या वाढत आहे. यामुळे बालचमूंसह तरुणाईमध्ये उत्साह निर्माण होत असल्याचे ते म्हणाले. निवृत्त कर्नल दीपक गुरूंग यांनी शिवरायांच्या युद्धनीतीचा व गनिमी काव्याचा प्रभाव भारतीय लष्कराच्या अभ्यासक्रमात असल्याचे आवर्जुन सांगितले.
स्वराज्यातील प्रत्येक किल्ल्याचा इतिहास छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार आहे. आपण जेव्हा किल्ला स्पर्धेत सहभागी होतो तेव्हा किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व समजून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन परीक्षक मंडळाने केले. परीक्षक मंडळातर्फे अनिल चौधरी व नितीन कपिलेश्वरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. समन्वयक विनायक जाधव यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.