वृत्तसंस्था/ बेंगळूर
येथील कंठीरव्वा स्टेडियमवर सुरू असलेल्या नवव्या प्रो कबड्डी लिग पुरुषांच्या स्पर्धेत शनिवारी दोन्ही सामने बरोबरीत (टाय) राहिले. पाटणा पायरेटस्ने पुणेरी पलटनला 34-34 असे बरोबरीत रोखले. या स्पर्धेतील हा पहिला सामना टाय झाला. त्यानंतर दुसऱया सामन्यात गुजरात जायंटस्ने तामिळ थलैवाजला 31-31 असे बरोबरीत रोखले.
पुणेरी पलटन आणि पाटणा पायरेटस् यांच्यातील शनिवारी झालेल्या सामन्यात पुणेरी पलटन संघातील अस्लम इनामदार आणि मोहित गोयात यांनी दर्जेदार खेळाच्या जोरावर पाचव्या मिनिटाला आपल्या संघाला 5-3 अशी आघाडी मिळवून दिली. पाटणा पायरेटस् संघातील बचावफळीत खेळणाऱया सुनीलची कामगिरी महत्त्वाची ठरली. 11 व्या मिनिटाला पाटणा पायरेटस्ने पुणेरी पलटनचे सर्व गडी बाद करत आपल्या संघाला 12-9 अशा तीन गुणांची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पुणेरी पलटन संघातील अलंकार पाटीलने पाटणा पायरेटच्या रोहित गुलियाला बाद करत पाटणा पायरेटस्चे सर्व गडी बाद केले. पुणेरी पलटनने सामन्याच्या मध्यंतरापर्यंत पाटणा पायरेटस्वर 23-16 अशी आघाडी मिळवली होती. सामन्याच्या उत्तरार्धात पाटणा पायरेटस्च्या सचिनने आपल्या दोन चडायावर संघाला गुण मिळवून दिले. त्यामुळे पाटणा पायरेटस्ने पुणेरी पलटनच्या समीप जाताना 27 व्या मिनिटाला पुणेरी पलटनचे सर्व गडी बाद केल्याने पाटणा पायरेटस्ने 26-24 अशी दोन गुणांची आघाडी मिळवली. त्यानंतर आकाश शिंदे आणि अस्लम इनामदार यांच्या कामगिरीमुळे पुणेरी पलटनने पाटणा पायरेटस्ला 30-30 असे बरोबरीत रोखले. या सामन्यात अखेरच्या मिनिटाला दोन्ही संघ 34-34 असे बरोबरीत राहिल्याने ही लढत अखेर टाय ठरली.
शनिवारी या स्पर्धेतील झालेल्या दुसऱया एका सामन्यात गुजरात जायंटस्ने तामिळ थलैवाजला 31-31 असे बरोबरीत रोखले. गुजरात जायंटस्तर्फे रायडर राकेशने सर्वाधिक म्हणजे 13 गुण नोंदवले. राकेश आणि नरेंद्र यांनी गुजरातला पहिले गुण मिळवून दिले. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत गुजरात जायंटस्ने तामिळ थलैवाजवर 18-16 अशी दोन गुणांची आघाडी मिळवली होती. सामना संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना तामिळ थलैवाजने गुजरात जायंटस्वर 4 गुणांची आघाडी मिळविली होती पण त्यानंतर गुजरात जायंटस्च्या राकेशने आपल्या चढाईवर तामिळ थलैवाजच्या चार खेळाडूंना बाद करत आपला संघाला 31-31 अशी बरोबरी साधून दिली. या स्पर्धेतील हा शनिवारचा टाय राहिलेला दुसरा सामना आहे.